Goa Election 2022: “भाजपने दुसऱ्या पक्षातून उमेदवार विकत घेतले, ५ वर्षांत गोव्याची दुर्दशा केली”: नवाब मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 07:26 PM2022-02-10T19:26:39+5:302022-02-10T19:27:21+5:30
Goa Election 2022: योग्य पर्यटन धोरण, व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करून विकास साधण्याचे आमचे ध्येय आहे, असे नवाब मलिक म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : भाजप सरकारने गोव्याची दुर्दशा केली आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात बेरोजगारी वाढली आहे, महत्त्वाचे असे पर्यटनक्षेत्र पूर्णपणे ढासळलेले आहे. या सर्व गोष्टीला भाजप सरकार जबाबदार असून, येणाऱ्या निवडणुकीत गोव्याची जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्राचे अल्पसंख्याक व्यवहार आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अविनाश भोसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा शुक्रवारी प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात पुढे भाजपविरोधातील जे सरकार येईल, त्या सरकारात आम्ही निश्चितरित्या असणार आहोत. चांगले लोकाभिमुख सरकार राज्यात देण्याचा आम्ही संकल्प केला आहे. बेरोजगारीची समस्या सोडविण्यावर आमचा भर आहे, योग्य पर्यटन धोरण, व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करून विकास साधण्याचे आमचे ध्येय आहे, असे मलिक यांनी पुढे सांगितले.
भाजपमध्ये सध्याच्या स्थितीला डॉ. प्रमोद सावंत वगळता सर्व उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून विकत घेतलेले आहेत. यावरून स्पष्ट होते की, भाजपकडे त्यांचे स्वत:चे कार्यकर्ते देखील नाहीत. बाबूशसारखे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार भाजपने यंदा रिंगणात उभे केले आहेत, भाजप ते उमेदवार सुधारले म्हणत असेल, तर त्यांनी लोकांना दाखवून द्यावे की, कुठल्या गंगेत त्यांनी अंघोळ केल्याने त्यांचे पाप धुतले गेले आहे ते. त्याचप्रमाणे वंशवादही सर्वात जास्त भाजपमध्येच दिसून येतो, असेही मलिक यांनी पुढे सांगितले.
नमस्ते ट्रम्प उपक्रमामुळे कोरोनाचा प्रसार झाला
कोरोना जेव्हा जगभर पसरत होता, तेव्हा आम्ही मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचे सुचविले होते. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. कारण त्यावेळी नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम मोदी सरकार ट्रम्पला खूश करण्यासाठी करत होते आणि यातूनच कोरोनाचा प्रसार देशात झाला. तसेच लॉकडाऊन राज्य सरकारने करायला सुरुवात केली, असे मोदी म्हणत असले तरी, लॉकडाऊनबाबत केंद्राने स्वत:कडेच अधिकार ठेवले होते. त्यामुळे मोदींनी उगाच कसलीही विधाने करून लोकांची दिशाभूल करू नये. ज्याप्रकारे लसींसाठी मोदी जबाबदार आहेत, तसेच कोरोना काळातील मृत्यूसाठीही मोदीच जबाबदार आहेत.