Goa Election 2022: पक्षांतर, भ्रष्टाचार करणार नाही! ‘आप’चे सर्व ३९ उमेदवार केजरीवाल यांच्या उपस्थितीत शपथबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 07:59 PM2022-02-02T19:59:34+5:302022-02-02T20:04:25+5:30
Goa Election 2022: निवडून आल्यास पक्ष सोडणार नाही तसेच भ्रष्टाचार करणार नाही, अशी शपथ गोवा आपच्या सर्व उमेदवारांनी अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : निवडून आल्यास पक्ष सोडणार नाही तसेच भ्रष्टाचार करणार नाही, अशी शपथ आम आदमी पक्षाच्या सर्व ३९ उमेदवारांनी बुधवारी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत घेतली.
याप्रसंगी पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले की, गोव्याच्या राजकारणाला लागलेली भ्रष्टाचार आणि पक्षांतराची कीड दूर करण्यासाठी आम्ही प्रामाणिक आणि मेहनती उमेदवार निवडले आहेत. आमचे सर्व उमेदवार भ्रष्टाचार आणि पक्षांतराविरोधातील प्रतिज्ञेवर सह्या करतील. प्रतिज्ञापत्राच्या प्रती घरोघरी मतदारांना दिल्या जातील. जेणेकरून एखाद्या उमेदवाराने निवडून आल्यानंतर स्वार्थासाठी पक्षांतर केल्यास मतदारच त्याच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करू शकतील.
केजरीवाल म्हणाले की, आपापल्या मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार प्रामाणिकपणे लोकांची सेवा बजावतील. जनतेचा विश्वासघात करणार नाहीत. सर्व ३९ उमेदवारांनी शपथ घेताना असे म्हटले आहे की, ईश्वराला साक्षी ठेवून आम्ही अशी शपथ घेतो की, माझ्या मतदारसंघात लोकांनी मला निवडून दिल्यास मी कधीच कोणाकडूनही लाच घेणार नाही. आम आदमी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. मतदारांची नेहमीच सेवा करणार. मी जर दिलेला शब्द पाळला नाही, तर मतदार कोर्टात जाऊन माझ्यावर कारवाई करू शकता. कोणाच्याही दबावाला बळी न पडता स्वखुशीने मी ही प्रतिज्ञा करीत असल्याचे म्हटले आहे. डिचोली मतदारसंघात आपने उमेदवार दिलेला नसून अन्य उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे.