Goa Election 2022: “मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था”; संजय राऊतांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 12:03 PM2022-01-20T12:03:34+5:302022-01-20T12:04:47+5:30
Goa Election 2022: नटसम्राट म्हटल्याचा आनंद असून, आम्ही सोंगाडे नाही. शब्द फिरवणारे राजकारणी तर नक्कीच नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार असून, त्याबाबतची रणनीती आखण्यासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल गोव्यात आले आहेत. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. आम्हाला नटसम्राट म्हटल्याचा आम्हाला आनंद आहे, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही. उलट, मला कोणी खूर्ची देते का खूर्ची अशी अवस्था देवेंद्र फडणवीसांची झाली आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.
संजय राऊतांना नटसम्राटमध्ये भूमिका द्यायला पाहिजे. कारण ते सकाळी वेगळे आणि संध्याकाळी वेगळे बोलायची उत्तम भूमिका करू शकतात. मनोहर पर्रिकर आजारी असताना त्यांनी विधानसभेमध्ये जाऊन बजेट मांडले होते, तेव्हा याच संजय राऊतांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि गोव्यातले सरकार आजारी आहे, सरकार चालवणे अयोग्य आहे, असे सांगितले होते. आता तेच संजय राऊतांचे मगरीचे अश्रू वाहत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना टोला लगावला आहे.
मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था
नटसम्राट हे महाराष्ट्राचे फार मोठे वैभव आहे आणि गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा असल्याचे त्यांना माहिती नाही. महाराष्ट्रातील सगळे नटसम्राट गोव्यातूनच गेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. त्यामुळे नटसम्राटची खिल्ली उडवून ते गोव्यातील जनतेचा, रसिकजनांचा आणि नाट्यकर्मींचा अपमान करत आहेत. नाटकात कोणी घर देता का घर असे एक वाक्य आहे. तशीच फडणवीसांची मला कोणी खूर्ची देते का खूर्ची अशी अवस्था आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही
नटसम्राट म्हणाल्याने आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत. गोव्याने मराठी रंगभूमी संपन्न केली. नटसम्राट म्हणाल्याचा आम्हाला आनंद आहे, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी नाही, असे संजय राऊत यांनी सुनावले.
प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने निवडणूक लढवावी
तेव्हा पर्रिकर सक्रीय नव्हते. याचा अर्थ त्यांच्या बाबतीत काही दुर्दैवी घटना व्हावी अशी आमची भूमिका नव्हती. आम्ही इतके निर्देयी नाही. त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशी आम्ही प्रार्थना करत होतो. उत्पल पर्रिकर यांना तिकीट द्यायचं की नाही हा भाजपचा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने निवडणूक लढवावी, असे संजय राऊत म्हणाले.