Goa Election 2022: भाजपच्या सहा उमेदवारांची आज घोषणा; बाबूश मोन्सेरात, माविन गुदिन्हो यांची कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 08:57 AM2022-01-25T08:57:15+5:302022-01-25T08:58:13+5:30

Goa Election 2022: दिल्लीहून सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

goa election 2022 six bjp candidates can be announced today | Goa Election 2022: भाजपच्या सहा उमेदवारांची आज घोषणा; बाबूश मोन्सेरात, माविन गुदिन्हो यांची कसोटी

Goa Election 2022: भाजपच्या सहा उमेदवारांची आज घोषणा; बाबूश मोन्सेरात, माविन गुदिन्हो यांची कसोटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : भाजपचे सहा विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार आज, बुधवारी ठरणार आहेत. दिल्लीहून सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सांताक्रूझ, कुंभारजुवे, कुठ्ठाळीचे उमेदवार कोण असतील हे जाणून घेण्यास भाजपचे कार्यकर्ते उत्सूक आहेत.

सांताक्रुझमध्ये आग्नेल डिकुन्हा यांनाच तिकीट द्या, हा आमदार बाबूश मोन्सेरात यांचा आग्रह आहे. आपण सांताक्रुझची जागा जिंकून दाखवतो, तिथे आग्नेलना तिकीट द्या, असे बाबूशने देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे. फडणवीस यांनी सांताक्रुझमधून एकूण तीन नावे दिल्लीला अमित शहा व जे. पी. नड्डा यांच्याकडे पाठवली आहेत. टोनी फर्नांडिस व गिरीश उस्कैईकर यांचेही नाव पाठविले गेले आहे. मंगळवारी एक नाव जाहीर होईल. 

कुंभारजुवे मतदारसंघात पांडुरंग मडकईकर किंवा त्यांची पत्नी तसेच सिध्देश नाईक यापैकी एकाला तिकीट मिळेल. त्याचबरोबर रोहन हरमलकर यांचाही तिकीटावर दावा आहे. पण दिल्लीत तीनच नावे प्रदेश भाजपकडून पाठवण्यात आली आहेत. कुठ्ठाळी मतदारसंघात कुणाला तिकीट द्यावे हा तिढा आहे. माविन गुदिन्हो यांनी गिरीश पिल्लई यांच्या नावाचा आग्रह धरला असून भाजपला ते नाव मान्य नाही.

डिचोली मतदारसंघात सभापती राजेश पाटणेकर यांना तिकीट दिले जाईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काल पुन्हा डिचोलीला भेट दिली. तिथे जे कार्यकर्ते अगोदर नरेश सावळ व डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या बाजूने गेले होते, त्यापैकी काही कार्यकर्ते आता पुन्हा भाजपकडे आले आहेत. त्या कार्यकर्त्यांना पाटणेकर यांना तिकीट दिलेली हवी होती. त्यामुळे ते आले. शिल्पा नाईक यांना तिकीट देण्यास पाटणेकर यांच्या कार्यकर्त्यांचा विरोध होता. त्यामुळे कार्यकर्ते फुटले होते. आता पाटणेकर यांना तिकीट पक्के झाल्याने कार्यकर्ते परत आले. कुडतरी मतदारसंघातही भाजपचा उमेदवार आज जाहीर होईल. आलेक्स रेजिनाल्ड हे अपक्ष लढत असले तरी, कुडतरीत रेजिनाल्ड यांना भाजप पाठींबा देणार नाही.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवार, दि. ३० रोजी गोवा भेटीवर येणार आहेत. ते भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. पंतप्रधान मोदी हेही गोवा भेटीवर येणार आहेत. या दोन्ही प्रमूख नेत्यांच्या भेटीत राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे बंडखोरासंदर्भात काय निर्णय घेतील हेही पहावे लागणार आहे.

उमेदवारी यादी येताच भाजपमध्ये अनेकांनी बंड पुकारले. यामध्ये दिलीप परुळेकरांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आले. मात्र, पार्सेकर, उत्पल निर्णयावर ठाम आहेत. मंगळवारी जाहीर होणाऱ्या उमेदवारीमध्ये कोणाचे नशिब चमकणार हे पहावे लागणार आहेच शिवाय आणखी कोण बंडाचे निशाण हाती घेईल का? हेही कळून येईल.

पंतप्रधान आज संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांना ओडिओच्या माध्यमातून नमो ॲपवर मार्गदर्शन करणार आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड व मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते देशभरातील भाजप कार्यकर्त्यांची संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ११ वाजता नमो ॲपवर पंतप्रधानांच्या या संवादाचा तथा मार्गदर्शनाचा लाभ देशभरातील भाजप कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांना घेता येईल.  असे कळवण्यात आले आहे. कोरोनामुळे निवडणूक  जाहीर सभांवर बंदी घालण्यात आली आहे.
 

Web Title: goa election 2022 six bjp candidates can be announced today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.