Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसतर्फे ११ उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा; गोवा प्रदेश कार्यकारिणी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 10:01 AM2022-01-19T10:01:26+5:302022-01-19T10:02:13+5:30
Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली असून, किरण कांदोळकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : फातोर्डा मतदारसंघात हेविवेट लढत पहायला मिळण्याचे संकेत असून, खासदार लुईझिन फालेरो हे या मतदारसंघात तृणमूलच्या उमेदवारीवर गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई यांच्याशी टक्कर देणार आहेत.
तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, त्यात ११ उमेदवारांची नावे आहेत. फातोर्डा मतदारसंघात लुईझिन फालेरो, कुंकळ्ळीत डॉ. जॉर्सन फर्नांडिस, नावेलीत वालंका आलेमाव, बाणावलीत चर्चिल आलेमाव, नुवेंत जुझे काब्राल, कुठ्ठाळीत गिल्बर्ट मारियानो रॉड्रिगीश, पर्येत गणपत गांवकर, कुंभारजुवेत समील वळवईकर, सांत आंद्रेत जगदीश भोबे, हळदोणेत किरण कांदोळकर तर पर्वरीत संदीप वझरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या उमेदवारीची दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
किरण कांदोळकरांची प्रदेशाध्यक्षपदी निवड
तृणमूल काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली असून, किरण कांदोळकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. अशोक नाईक, डॉ. जॉर्सन फर्नांडिस, फारेल फुर्तादो, कांता गावडे, किशोर नार्वेकर, राजेंद्र काकोडकर, नाफिसा अली, रोहिदास देसाई आणि शिवदास नाईक यांना प्रदेश उपाध्यक्ष बनवले आहे.