Goa Election 2022: पणजीत ‘काँटे की टक्कर’! उत्पलच्या भूमिकेमुळे भाजपसमोर आव्हान; पर्रिकर समर्थक सुखावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 02:38 PM2022-01-22T14:38:04+5:302022-01-22T14:38:51+5:30

Goa Election 2022: पणजी भाजपचा गड असून, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकरांचा प्रभाव आजही कायम असल्याचे सांगितले जात आहे.

goa election 2022 utpal parrikar role poses challenge to bjp in panjim manohar parrikar supporters sighed | Goa Election 2022: पणजीत ‘काँटे की टक्कर’! उत्पलच्या भूमिकेमुळे भाजपसमोर आव्हान; पर्रिकर समर्थक सुखावले

Goa Election 2022: पणजीत ‘काँटे की टक्कर’! उत्पलच्या भूमिकेमुळे भाजपसमोर आव्हान; पर्रिकर समर्थक सुखावले

Next

पूजा नाईक-प्रभुगावकर, लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : उत्पल पर्रीकर यांना डावलून आमदार बाबूश मोन्सेरात यांना पणजीची उमेदवारी दिल्याने निवडणुकीत भाजपला त्याचे परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांनी उत्पल यांना काही प्रत्यक्ष तर काहीजण अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत असल्याने भाजपसाठी ते डोकेदुखी ठरू शकतात. उत्पलने आपण अपक्ष लढेन असे जाहीर केल्याने पर्रीकर यांचे पणजीतील कट्टर समर्थक सुखावले आहेत.

पणजी हा तसा भाजपचा गडकिल्ला मानला जातो. त्यातही माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचा पणजीवर प्रभाव आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतरसुद्धा कार्यकर्ते त्यांची आठवण काढतात. त्याचाच उत्पल यांना फायदा तर भाजपला  तोटा होणार आहे. भाजपचे अनेक कार्यकर्ते उत्पलला उघडपणे पाठिंबा देण्याबरोबरच भाजपविरोधात बोलत आहे. त्यामुळे भाजपच्या मताधिक्क्याला हादरा बसण्याची दाट शक्यता आहे.

आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सध्या पणजीत प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांनी अधिकृत प्रचाराला नुकतीच सुरुवात केली असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात त्यांनी एक वर्षापूर्वीच त्यांची तयारी सुरू केली होती. मतदारसंघातील नोकऱ्यांची कामे करण्यापासून ते गरजूंना आर्थिक मदत करणे आदी कामे ते करीत आहे. मात्र, आता निवडणुकीच्या  रिंगणात उत्पल यांनीसुद्धा उडी घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने मोन्सेरात यांच्यासाठी हे मोठे आव्हान ठरले आहे.

उत्पल  हे सारस्वत समाजातील आहेत. त्या समाजाची बऱ्यापैकी लोकसंख्या मतदारसंघात आहे. या समाजातील अनेकजण उत्पल यांना पाठिंबा देत असल्याने सुध्दा मोन्सेरात यांच्या मतांवर फरक पडू शकतो. दुसरीकडे कॉंग्रेसने एल्वीस गोम्स यांना उमेदवारी दिली आहे. मोन्सेरात व उत्पल यांच्या तुलनेत पाहिले तर गोम्स हे कमकुवत उमेदवार आहेत. त्यामुळे खरी स्ट्रेट फाईट म्हटली तरी मोन्सेरात व उत्पल यांच्यातच होईल.

मतदारांची सावध भूमिका...

निवडणुकीत कोण कधी बाजी मारेल हे सांगता येत नाही. अगदी एका मताच्या फरकानेसुद्धा उमेदवार निवडून आल्याची यापूर्वीची उदाहरणे आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला उत्पल की मोन्सेरात असे विचारले तर मतदानावेळीच पाहू अशी सावध भूमिका मतदारांनी ठेवल्याचे त्यांच्या उत्तरावरुन दिसते. मात्र, सध्या तरी पणजीत उत्पल पर्रीकर यांनी राजकीय वातावरण तापवल्याने ते भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात.
 

Web Title: goa election 2022 utpal parrikar role poses challenge to bjp in panjim manohar parrikar supporters sighed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.