Goa Election 2022: भाजपला धक्के पे धक्का! उत्पल पर्रिकरांची ताकद वाढतेय; आता सुभाष वेलिंगकरांचाही पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 05:08 PM2022-02-03T17:08:56+5:302022-02-03T17:09:44+5:30
Goa Election 2022: माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या पहिल्या निवडणूक विजयात सुभाष वेलिंगकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
पणजी: दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघात पहिल्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांची उत्पल पर्रीकर यांनी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. उत्पल यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
वेलिंगकर यांचे पुत्र शैलेंद्र यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज भरला होता. तो मागे घेत त्यांनी याआधीच उत्पल यांना पाठिंबा दिलेला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष वेलिंगकर हे गोवा सुरक्षा मंचच्या तिकिटावर रिंगणात होते. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी ते निवडणूक रिंगणातून बाहेर आहेत. उत्पल पर्रीकर यांनी काँग्रेस व आप वगळता भाजपविरोधी प्रत्येक घटकाकडून पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. काँग्रेसने तिकीट नाकारल्याने बंडखोरी केलेले माजी महापौर उदय मडकईकर यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मगोप-तृणमूल युती पणजीबाबत एक-दोन दिवसात निर्णय घेईल असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता उत्पल यांना अधिक पाठिंबा मिळाला आहे.