Goa Election 2022: बंडखोरीचा फटका कोणाला बसणार? गोव्यात माजी मंत्री, आमदारांमुळे रंगत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 11:13 AM2022-01-24T11:13:15+5:302022-01-24T11:13:49+5:30

Goa Election 2022: सर्वपक्षीय लढतीमुळे निवडणूक रंगतदार होणार असून, मतदार नक्की कोणाला कल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

goa election 2022 who will be affected by the rebellion in goa the color increased due to former ministers and mla | Goa Election 2022: बंडखोरीचा फटका कोणाला बसणार? गोव्यात माजी मंत्री, आमदारांमुळे रंगत वाढली

Goa Election 2022: बंडखोरीचा फटका कोणाला बसणार? गोव्यात माजी मंत्री, आमदारांमुळे रंगत वाढली

googlenewsNext

देविदास गावकर, लाेकमत न्यूज नेटवर्क

खोतीगाव : काणकोण मतदारसंघातील भाजपची उमेदवारी माजी मंत्री रमेश तवडकर यांना देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसमधून निवडून येऊन भाजपमध्ये गेलेले माजी आमदार, उपसभापती इजिदोर फर्नांडिस अपक्ष निवडणुकीत उतरणार आहेत. काँग्रेसने जनार्दन भंडारी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले महादेव देसाई हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमधून उमेदवारी दाखल करणार आहेत. आरजीतर्फे प्रशांत पागी, आम आदमीतर्फे अनुप कुडतरकर, भाजपाचे माजी आमदार विजय पै खोत हे अपक्ष उमेदवार रिंगणात असतील. तब्बल सात उमेदवार येथून आपले नशीब आजमावणार आहेत. 

२०१२मध्ये काणकोण तालुक्यात पैंगिण आणि काणकोण असे दोन मतदारसंघ एक झाल्याने दोन्ही ठिकाणी सत्तेवर असलेल्या भाजपने काणकोण मतदारसंघातून रमेश तवडकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी निवडून आलेले तवडकर मंत्री झाले. ते चार खात्यांचे मंत्री होते. पण २०१७च्या निवडणुकी वेळी तवडकर यांना भाजपची उमेदवारी न देता विजय पै खोत यांना देण्यात आली. तेव्हा तवडकर यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. परिणामी भाजप उमेदवाराला हार पत्करावी लागली. काँग्रेसचे उमेदवार इजिदोर फर्नांडिस यांना याचा फायदा होऊन ते आमदार म्हणून निवडून आले.

आताच्या निवडणुकीत पक्षात सक्रिय झालेल्या रमेश तवडकर आणि फर्नांडिस या दोघांनीही प्रचार सुरू ठेवला. त्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे काणकोणवासीयांच्या नजरा लागल्या होत्या. या उमेदवारीची निवड करताना दक्षिण गोव्यासह काणकोण तालुक्यातही भाजप कार्यकर्त्यांमध्ये बरीच खडाजंगी झाली. पण भाजपने  तवडकर यांनाच उमेदवारी दिली. त्यानंतर इजिदोर यांनी स्वतः अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याचेही जाहीर केले. भाजप युवा मंडळ अध्यक्ष, काणकोण तालुकाप्रमुख आणि काणकोणातील सर्व पंचायतींचे सरपंच,  काही माजी नगराध्यक्ष व नगरसेवक त्यांच्या मागे आहेत. 

मात्र, रमेश तवडकर यांनी प्राथमिक स्तरावर आपले प्रचारकार्य गांभीर्याने सुरू ठेवले आहे. भाजपचे नेते विजय पै खोत यांनी हल्लीच पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला असून, ते जुन्या मतदारांबरोबर त्यांच्या सगे-सोयरे, नातेवाईकांच्या मदतीने शांतपणे प्रचार करीत आहेत.  

गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे सक्रिय प्रशांत नाईक यांनी फॉरवर्ड - काँग्रेस युतीनंतर आपल्या स्वतंत्र कामावर भर दिला आहे. काँग्रेसने जनार्दन भंडारी यांना उमेदवारी दिल्याने सक्रिय कार्यकर्ते महादेव देसाई यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसकडे धाव घेतली. त्यांची उमेदवारी काँग्रेसला किती मारक ठरेल, हाही प्रश्नच आहे. जनार्दन भंडारी आणि प्रशांत नाईक हे दोघेही चळवळीतील कार्यकर्ते असल्याने त्यांचा युवा पिढीवर प्रभाव दिसत आहे.

काँग्रेसकडे नेतृत्व उरले नाही

मध्यंतरी भाजपकडे विजय पै खोत हे एकमेव नेते होते. मात्र, बंडखोरी केलेले तवडकर पुन्हा भाजपात परतले. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार फर्नांडिसही भाजपात आले. त्यामुळे भाजपमध्ये तीन नेते तयार झाले, तर काँग्रेसकडे नेताच उरला नाही.
 

Web Title: goa election 2022 who will be affected by the rebellion in goa the color increased due to former ministers and mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.