Goa Election 2022: एकट्या उत्पल पर्रीकरांना भाजपचा वेगळा न्याय का? मतदारांची विचारणा; अपक्ष लढतीवर संमिश्र प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 02:03 PM2022-01-22T14:03:39+5:302022-01-22T14:04:46+5:30

Goa Election 2022: पणजीतील मतदारांनी भाजपने उत्पल पर्रिकरासंदर्भात घेतलेल्या भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

goa election 2022 why bjp different justice to utpal parrikar alone questioning of voters and mixed reaction to independent struggle | Goa Election 2022: एकट्या उत्पल पर्रीकरांना भाजपचा वेगळा न्याय का? मतदारांची विचारणा; अपक्ष लढतीवर संमिश्र प्रतिक्रिया

Goa Election 2022: एकट्या उत्पल पर्रीकरांना भाजपचा वेगळा न्याय का? मतदारांची विचारणा; अपक्ष लढतीवर संमिश्र प्रतिक्रिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने या मतदारसंघातून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. मात्र, जर घराणेशाहीचा आरोप होत असतानाही इतर उमेदवारी कायम ठेवली जाऊ शकते मग उत्पलला वेगळा न्याय कशासाठी? अशी विचारणा होत आहे. उत्पल यांनी अपक्ष लढण्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत. 

भाजपने उत्पल पर्रीकर यांना डिचोली किंवा सांताक्रूझमधून उमेदवारी लढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, प्रस्ताव उत्पल पर्रीकर यांनी फेटाळला. आपल्याला डिचोलीतून नव्हे तर पणजीतूनच लढायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते आता भाजप उमेदवाराविरोधात अपक्ष लढत देतील. त्या अनुषंगाने मतदारांकडून उत्पल यांना वेगळा न्याय भाजपने का लावला? अशी विचारणा केली आहे.

पणजीत उत्पल पर्रीकरच योग्य उमेदवार होता. उत्पल हा युवा व शिक्षित उमेदवार ठरु शकला असता. महत्वाचे म्हणजे उत्पलची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे. भाजपने उत्पलला उमेदवारी द्यायला पाहिजी होती. कारण मूळ भाजपचे कार्यकर्ते उत्पल सोबत आहेत. यात माझाही समावेश आहे. आता यापुढे उत्पल जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे.  माझा पूर्ण पाठिंबा त्याला असणार आहे. - शुभा धोंड, माजी नगरसेवक, पणजी

बाबुश मोन्सेरात यांनी पणजीची उमेदवारी देण्याचा भाजपचा निर्णय चुकीचा आहे. भाजपमधील काही अधिकाऱ्यांनी लाचार होऊन हा निर्णय घेतला असावा. ज्या व्यक्तिला बलात्कारी, गुन्हेगारीची पार्श्वभूमी लाभली आहे, त्याला उमेदवारीच देऊ नये. एकेकाळी हीच माणसे बाबुश यांच्यावरील गुन्ह्यांबाबत टीका करत होते. आता त्यांना मते द्या असे सांगत आहे. यावरुन राजकारण कुठल्या स्तराला पोहोचले आहे, हे दिसून येते. उत्पल हाच पणजीत योग्य उमेदवार होता. आणि ७५ टक्के जुने कार्यकर्ते हे उत्पल सोबत आहे. - सुरेश चोपडेकर, माजी नगरसेवक, पणजी

खरेतर या विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे. पण त्यासाठी नव्या चेहऱ्यांनी तसे काम केले असले पाहिजे. भाजपने घेतलेला निर्णय योग्य आहे, असे वाटते. मोन्सेरात यांचे स्वत:चे मतदार आहेत. त्यांनी मतदारसंघात आपले कार्य अनेक दिवसांपासून सुरू ठेवले होते. वस्तूत: तशाच पद्धतीने उत्पल यांनी आधीपासून तयारी करणे, कार्य करणे हे सर्वांना अपेक्षित होते. उत्पल यांनी अस्तित्व निर्माण करून दाखवावे. -  कुंतल नाईक

आम्ही सुरुवातीपासून भाजपसोबत आहोत, त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या प्रत्येक निर्णय आम्ही मान्य केला आहे. आतादेखील जो निर्णय पक्षाने घेतलेला आहे, तोदेखील विचारपूर्वक घेतला असेल. आम्हाला पक्ष जो उमेदवार देतो, त्यासाठी आम्ही काम करतो. यंदादेखील जी जबाबदारी पक्ष मला देईल, ती मला मान्य असणार आहे. - शेखर डेगवेकर, माजी नगरसेवक, पणजी

राजकारण हे समाजभिमुख असायला पाहिजे. परंतु सध्याचे राजकारण हे सत्ताभिमुख झाले आहे. पणजीच्या उमेदवारीबाबत जो निर्णय भाजपने घेतला आहे, यावरुन अनेक निष्ठावंत कार्यकर्ते दुखविले गेले आहे. भाजपची जी आधीची विचारसरणी होती, ती संपुष्टात आल्यात जमा आहे. उत्पलसारख्या सुशिक्षित उमेदवाराला वगळून मोन्सेरात यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपला महागात पडणार आहे. - शैलेंद्र वेलिंगकर, सामाजिक कार्यकर्ते

मनोहर पर्रीकर हे भाजपला अवघ्या २ जागांवरून २१ वर घेऊन गेले. श्रीपाद भाऊयांच्या सोबत त्यांनी राज्यात पक्षाचे जाळे विणले. जर भाजप ज्योसुआ डिसोझा, जेनिफर मोन्सेरात आणि दिव्या राणे यांना उमेदवारी देऊ शकते, तर उत्पल यांना वेगळी वागणूक का? आम्ही कुणाच्याही विरोधात नाही, तर उत्पल यांच्या बाजूने आहोत. पणजीकरांच्या हृदयात पर्रीकर यांचे नाव कायम आहे. - सुदिन कामत

भाजप सरकारची सद्यस्थिती पाहता उत्पल पर्रीकर यांना तिकीट न देणे ही भाजपचा अत्यंत वाईट निर्णय आहे. खरेतर मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेतील आणि आम्हाला आमचे जुने गोवा परत आणण्यास मदत करतील. त्यांना पक्षाने उमेदवारी देणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडलेले नाही ही चुकीची बाब आहे. - कल्पेश कुबल

भाजपने उमेदवारी देताना घराणेशाहीपेक्षा कुणी काम केले आहे ते पाहिले आहे. बाबूश मोन्सेरात यांची मतदारसंघात शक्ती असली तर त्यांच्या पार्श्वभूमीचा विचार करायला हवा होता. त्यांची मतदारसंघात शक्ती आहे हे खरे आहे. दुसऱ्या बाजूने उत्पल यांनी काहीतरी करायला पाहिजे होते, जेणेकरून लोकामध्ये त्यांच्या प्रती विश्वास निर्माण झाला असता. तसे न झाल्याने भाजपने त्यांना उमेदवारी दिलेली नाही. -  अमांदा व्हिएगस

पणजी मतदारसंघात भाजपचा ताबा नाही. भाजपने तेव्हा मोन्सेरात यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. म्हणून पर्रीकर यांना तेव्हाही पणजीत जिंकता आले होते. गेल्या निवडणुकांत बाबूश मोन्सेरात यांनी सिद्धार्थ कुंकळ्ळेकर आणि सुभाष वेलिंगकर यांना हरवले होते. मग आता उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी दिली तरी त्यांना ही जागा जिंकणे शक्य नाही. उत्पल यांना तिकीट देणे म्हणजे एक जागा गमावणे.  -  रजत विराज बखले

 

Web Title: goa election 2022 why bjp different justice to utpal parrikar alone questioning of voters and mixed reaction to independent struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.