पोटनिवडणुकांच्या विषयावरून सरकारमध्ये मगोपची अडचण शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 11:55 AM2019-03-08T11:55:22+5:302019-03-08T11:59:50+5:30
गोव्यात विधानसभेच्या दोन मतदारसंघांमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकांवेळी भाजपाच्या उमेदवारांविरुद्ध मगोपने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सत्ताधारी आघाडीत संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.
पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचा महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) हा प्रमुख घटक पक्ष आहे. तथापि, गोव्यात विधानसभेच्या दोन मतदारसंघांमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकांवेळी भाजपाच्या उमेदवारांविरुद्ध मगोपने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सत्ताधारी आघाडीत संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षात मगो पक्षाची मोठी अडचण होऊ शकते, अशी माहिती मिळते.
पर्रीकर हे आजारी असले तरी, भाजपाविरुद्ध पोटनिवडणूक लढविण्याची मगोपची भूमिका मुख्यमंत्र्यांनाही आवडलेली नाही अशी चर्चा मंत्रिमंडळात सुरू आहे. गोवा फॉरवर्ड हाही पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. पर्रीकर यांनी मगो पक्षाच्या नेत्यांशी बोलून मगोपचे मन वळवावे व पोटनिवडणुका लढविण्यापासून मगोपला रोखावे अशी भूमिका गोवा फॉरवर्ड पक्षाने मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासमोर मांडली आहे. गोविंद गावडे हे पर्रीकर सरकारमध्ये कला व संस्कृती खात्याचे मंत्री आहेत. त्यांनीही जाहीरपणे मगोपच्या भूमिकेला आक्षेप घेतला आहे. मगो पक्ष सरकारमध्ये राहतो व भाजपाच्या उमेदवारांविरुद्ध पोटनिवडणुकही लढवू पाहतो ही स्थिती परस्पर विरोधी असून आम्हाला हे मान्य नाही असे मंत्री गावडे यांनी यापूर्वी म्हटले आहे.
शिरोडा व मांद्रे या दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले की, मगो पक्षावर भाजपाचा पूर्ण विश्वास आहे. मगोपच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री पर्रीकर हे चर्चा करतील व मगोपला पोटनिवडणुका लढवू नये अशी विनंती करतील. मगो पक्ष निश्चितच ऐकेल. महाराष्ट्रात शिवसेनेनेही अगोदर भाजपाविरुद्ध ताठर भूमिका घेतली होती व मग युती केली.
मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी मात्र मगो पक्ष पोटनिवडणुकांमधून माघार घेणार नाही असे सांगितले. आम्ही पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारसोबतच आहोत. तथापि, गद्दार व फुटीरांना धडा शिकवायला हवा म्हणून मगो पक्ष पोटनिवडणुका लढवत आहे, असा दावा ढवळीकर यांनी केला.
मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर हे नुकतेच मुख्यमंत्री पर्रीकर यांना भेटले. मात्र पोटनिवडणुकांविषयी पर्रीकर यांच्याशी काही चर्चा झाली नाही, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. मात्र काही मंत्र्यांच्या मते पोटनिवडणुकांच्या विषयावरून सरकारमधून बाहेर पडण्याची वेळ मगोपवर येऊ शकते.