Goa Election Results 2022 : भाजपाचं सत्तास्थापनेचं गणित ठरलं; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनीच सांगितली दोन 'मित्रां'ची नावं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 01:43 PM2022-03-10T13:43:27+5:302022-03-10T13:43:58+5:30
गोव्यात समोर आलेल्या कलावरून कोणताही पक्ष सध्या बहुमताच्या पुढे नसल्याचं दिसून येतंय.
Goa Election Results 2022 : आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. हळूहळू काही निकाल समोर येऊ लागले आहेत. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा या निवडणुकीत विजय झाला असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सागलानी यांचा पराभव केलाय. या पराभवानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपनं आपल्या सत्तास्थापनेचं गणित कसं असेल याची माहिती दिली आहे.
गोव्यात समोर आलेल्या कलांवरून आतापर्यंत तरी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाल्याचं चित्र नाही. परंतु भाजप सध्या १८ जागांवर आघाडीवर असून मोठा पक्ष म्हणून सध्या समोर आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला १२, टीएमसी आणि मित्रपक्षांना ३, तर आपला तीन जागांवर आघाडी मिळाल्याचं दिसत आहे. यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया देत गोव्यात भाजपच सरकार स्थापन करेल असा दावा त्यांनी केला आहे. तसंच आम्ही महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष (मगोप) आणि अपक्षांना सोबत घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
#WATCH "The credit for this win goes to the party workers...BJP will form the govt in Goa," says Goa CM Pramod Sawant#GoaElections2022pic.twitter.com/dVGPvnNidh
— ANI (@ANI) March 10, 2022
याशिवाय गोव्यात चर्चेची जागा असलेल्या पणजी मतदारसंघातून उपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या बाबूश मोन्सेरात यांनी त्यांचा पराभव केला. भाजपची साथ सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढणारे उत्पल पर्रिकर यांचा भाजपच्या बाबूश मोन्सेरात यांनी ७१३ मतांनी पराभव केला आहे. यानंतर उत्पल पर्रीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.. "मी सर्व मतदारांचे आभार मानतो. अपक्ष उमेदवार म्हणून ही लढत चांगली होती. या लढतीबाबत मी समधानी आहे, परंतु निकाल निराशाजनक आहेत," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.