गोव्यात पाच पालिकांच्या निवडणुका २३ एप्रिलला; मतपत्रिकांद्वारे मतदान पार पडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 02:54 PM2021-03-30T14:54:15+5:302021-03-30T14:54:48+5:30
पाचही पालिकांमध्ये एकूण १ लाख ८५ हजार २२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतपत्रिकांद्वारे मतदान घेतले जाईल.
पणजी : म्हापसा, मडगांव, मुरगांव, केपें आणि सांगे पालिकांच्या निवडणूका येत्या २३ एप्रिल रोजी होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने तारीख घोषित केली असून या निवडणुकांसाठी आजपासून पाचही पालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. मतमोजणी २६ एप्रिल रोजी होईल.
पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांनी निवडणुकांची तारीख जाहीर केली. पाचही पालिकांमध्ये एकूण १ लाख ८५ हजार २२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतपत्रिकांद्वारे मतदान घेतले जाईल. या निवडणुकीसाठी १७९० मनुष्यबळ लागणार आहे.
उद्या बुधवारी ३१ पासून उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू होईल. २ एप्रिल गुड फ्रायडे व ४ एप्रिल रविवार वगळता ८ एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. २३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत कोविडबाधित रुग्ण मतदानाचा हक्क बजावू शकतील
वरील पाच पालिकांच्या निवडणुका आरक्षण घोळामुळे सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिल्याने पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. ३० एप्रिलपर्यंत या पाचही पालिकांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सांगितले आहे. या पालिकांमध्ये सरकारने नव्याने आरक्षण जाहीर केले. त्यानंतर आज निवडणुकांची तारीख जाहीर झालेली आहे. सहा पालिकांमध्ये तसेच महापालिकेसाठी याआधीच मतदान होऊन निकालही जाहीर झालेले आहेत.