गोवा : तुरुंग महानिरीक्षकपदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतलेले एल्विस गोम्स ‘आप’मध्ये
By Admin | Published: October 5, 2016 01:12 PM2016-10-05T13:12:32+5:302016-10-05T13:12:49+5:30
तुरुंग महानिरीक्षकपदावरुन नुकतीच स्वेच्छा निवृत्ती घेतलेले गोवा प्रशासनातील एल्विस गोम्स यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ५ - तुरुंग महानिरीक्षकपदावरुन नुकतीच स्वेच्छा निवृत्ती घेतलेले गोवा प्रशासनातील एल्विस गोम्स यानी बुधवारी येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कुंकळ्ळी मतदारसंघातून त्यांना पक्षाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा असून याबाबतची अधिकृत घोषणा कालांतराने होण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना गोम्स यांनी आपण पक्षात नव्हे तर चळवळीत सामील झालो आहे, असे प्रतिपादन केले. आम जनता प्रशासनाला कंटाळली असून ही वेळ सत्ता हातात घेण्याची आहे जे जनतेलाही कळून चुकले आहे. गोव्याचे प्रशासन कोलमडलेले आहे. शासकीय यंत्रणेला गंज चढली आहे, अशी टीका त्यांनी केली. आम आदमी पार्टी प्रशासनातील भ्रष्टाचार नष्ट करील, अशी ग्वाही त्यांनी दिली.