Goa: फिल्म सिटीसाठी ईएसजी लीजवर जागा घेणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 04:06 PM2023-11-16T16:06:10+5:302023-11-16T16:06:45+5:30
Goa News: गोव्यात फिल्म सिटी प्रकल्प आणण्यासाठी कोमुनिदादची जागा उपलब्ध आहे. तसेच गोवा मनोरंजन संस्था लीजवरही जागा घेऊ शकते, तेथेच कन्व्हेन्शन सेंटरही उभारले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
- नारायण गावस
पणजी - गोव्यात फिल्म सिटी प्रकल्प आणण्यासाठी कोमुनिदादची जागा उपलब्ध आहे. तसेच गोवा मनोरंजन संस्था लीजवरही जागा घेऊ शकते, तेथेच कन्व्हेन्शन सेंटरही उभारले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. इफ्फी निमित्त गोवा मनोरंजन संस्थेमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बाेलत होते. यावेळी गाेवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होत्या.
गाेव्यात गेली २० वर्षे इफ्फी महोत्सव हाेत आहे. पण गाेव्यात अजून चित्रपटांशी निघडीत मोठे प्रकल्प झाले नाही पण आता गाेव्यात फिल्मसिटी उभारण्याचा निर्णय झाला असून लवकरच जागाही निवडली जाणार आहे. फिल्मसिटी झाली तर अनेक गोमंतकीयांना रोजगारही मिळणार आहे. तसेच गोमतंकीय चित्रपटांना चांगला वाव मिळणार आहे. त्याचप्रमाणे गाेमंतकीय कलाकारांना योग्य असे व्यासपिठ मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
७ गोमंतकीय चित्रपटांची निवड
यंदाच्या इफ्फीत २० गाेमंतकीय चित्रपटांच्या इफ्फीसाठी प्रवेशिका सादर करण्यात आल्या होत्या. यातील ७ चित्रपटांची निवड झाली आहे. ही आम्हा गाेमंतकीयांसाठी अभिमानची बाब आहे. गोव्याचा चित्रपट आता आंतराष्ट्रीय पातळीवर झळकत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
सायं. ५ वा. उद्घाटन
इफ्फीचा उद्घाटन साेहळा हा तालीगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर हाेणार असून सायं. ५ वा. या महोत्सवाचे उद्घाटन हाेणार आहे. या उद्घाटनाला ईएसजीकडून प्रवेश पास घेऊन लोकांनी उपस्थिती लावून या सोहळ्याचा ाआनंद घ्यावा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रवेश योग्य बनविणार
राज्यातील दिव्यांगाना या इफ्फीत याेग्यरीत्या प्रवेश करायला मिळावा यासाठी इफ्फीची सर्व ठिकाणे प्रवेश याेग्य केली जाणार आहेत. यासाठी अशी साेय केली जाणार आहे. जेणेकरुन कुणालाच या महोत्सवाचा आस्वाद घेताना कमतरता भासणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ज्या लोकांनी प्रतिनिधी नाेंदणी केेली नाही त्यांच्यासाठी बाहेर विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यंदा मिरामार िबीच तसेच मडगाव रविंद्र भवन तसेच हणजूण बीच येथे ओपन स्क्रीन लावण्यात येणार आहे. तसेच दर्यासंगमावर विविध दालने उभारण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.