Goa: गोव्यात फार्मा कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी ‘एस्मा’ लागू
By किशोर कुबल | Published: October 11, 2023 01:59 PM2023-10-11T13:59:45+5:302023-10-11T14:00:25+5:30
Goa News: गोव्यात फार्मास्युटीकल्स कंपन्यांमधील कर्मचारी संपावर जाऊ नयेत यासाठी सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी ‘एस्मा’ लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा लागू झाल्याने कर्मचारी संपावर गेल्यास कडक कारवाई केली जाणार आहे.
- किशोर कुबल
पणजी - गोव्यात फार्मास्युटीकल्स कंपन्यांमधील कर्मचारी संपावर जाऊ नयेत यासाठी सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी ‘एस्मा’ लागू केला आहे.
अत्यावश्यक सेवा कायदा लागू झाल्याने कर्मचारी संपावर गेल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. या संबंधीचा आदेश बुधवारी काढण्यात आला.
औषध निर्मिती करणाय्रा कारखान्यांमधील उत्पादन, पॅकेजिंग, वितरण व वाहनूक अशा सर्वच विभागांना एस्मा लागू असल्याचे आदेशात म्हटले आहे.
गोवा राज्य फार्मा हब म्हणून ओळखले जाते. देशभरात उत्पादन होणाय्रा औषधांपैकी १२ टक्के औषधे गोव्यात उत्पादित होतात व ७० टक्के निर्यात केली जातात. गोव्यात अनेक फार्मा कंपन्या कार्यरत आहेत. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या अंदाजे ८० फार्मास्युटिकल युनिट्समधून दरवर्षी सुमारे १४ हजार कोटींची उलाढाल केली जाते. दरवर्षी सुमारे ११ हजार कोटींच्या औषधांची निर्यात केली जाते आणि अन्य उत्पादने भारतात विकली जातात.