भारत-पोर्तुगीजच्या कला संस्कृतीचे दर्शन घडविणारा ‘सेमान दा कुल्तुरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:37 PM2018-09-24T22:37:50+5:302018-09-24T22:38:05+5:30
पणजी : भारत-पोर्तुगीज या दोन्ही राष्ट्रांच्या समृद्ध कला सांस्कृतिक व खाद्यपदार्थांचा उत्सव साजरा करण्यासाठी दर वर्षी ‘सेमान दा कुल्तुरा इंडो-पोर्तुगीज (गोवा)’ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाचे हे दहावे वर्ष असून गोवा-पोर्तुगीजच्या पारंपरिक संस्कृ तीवर प्रकाश पाडणा-या या महोत्सवात कला, चित्रपट, संगीत, पाककृती, साहित्यांचा समावेश असेल. तसेच चित्रपट महोत्सव, संगीत कार्यक्रम व कार्यशाळा, छायाचित्र प्रदर्शनाचे कार्यक्रम होतील, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष फ्रान्सिस्को मार्टिन्स यांनी दिली. गोवा व पोर्तुगीजच्या सहयोगाने राज्यात २९ सप्टेंबरपासून हा महोत्सव होत आहे.
गोव्याची अनन्य ओळख राखण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. गोवा आणि पोर्तुगीज यांच्यात सामाजिक-आर्थिक संबंध वाढवण्याच्या उद्देशाने हा उत्सव होतो. येत्या आठवड्याच्या अखेरीस या उत्सवाला सुरुवात होईल. यासंबंधी माहिती देण्यासाठी पणजीत सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. याला संयुक्त सचिव फ्रान्सिस्को नोरोन्हा, माजी अध्यक्षा आॅर्टी सोरेस व मारीया इनेस फिगेरा उपस्थित होत्या.
फ्रान्सिस्को मार्टीन्स म्हणाले, भारत व पोर्तुगीज या देशांचा संस्कृती वारसा मोठा आहे. भारतात विविध संस्कृतींचे मिश्रण असून प्रत्येक गोष्टीचे वेगळे वैशिष्ट्य आहे. गोव्याचीही वेगळी सांस्कृतिक ओळख असून ती भारतीय आणि पाश्चात्य नृत्यांत मोडते. या महोत्सवातून लोकांना दोन्ही देशांच्या विविधतेचा आनंद लुटता येईल.
महोत्सवाची सुरुवात दि. २९ सप्टेंबरला हॉटेल मांडवीमध्ये होणा-या कार्यक्रमापासून होईल. याचे उद्घाटन माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते होईल. या वेळी ‘गोव्याच्या संस्कृतीवर पोर्तुगीज प्रभाव’ या विषयावर चर्चासत्र होईल. यात लेखक अलेक्झांडर बार्बोसा, इतिहासकार प्रजल साखरदांडे व मारीया लुडर््स ब्रावो डिकॉस्ता हे सदस्य भाग घेतील. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १० डिसेंबरपर्यंत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे दोन दिवस चालणारी ‘पाककला आणि सांगीतिक महोत्सव’ होय. ज्यात गोवा-पोर्तुगीजची खाद्यसंस्कृतीची मिष्टान्न असेल. २९ व ३० नोव्हेंबरला ताळगाव कॉम्युनिटीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल. गोव्यातील संगीतकारांची मैफलही होईल.
भारत-पोर्तुगीज हा महोत्सवअंतर्गत येत्या ५ डिसेंबरला फॅडो गायन स्पर्धा होईल. ही स्पर्धा इस्टिट्यूट ब्रांगाझाच्या सभागृहात होईल. शिवाय गायिका सोनीया शिरसाट व प्रो. डेल्फिम कोरिया डिसिल्वा हे खास कार्यशाळा घेतील. त्याचबरोबर इस्टिस्ट्यूट ब्रांगाझाच्या सभागृहात छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येईल. यात पॅटेलिओ फर्नांडिस यांच्या रेअर पोर्टेट्स’ या पुस्तकातील काहींचे छायाचित्र प्रदर्शनही भरविले जाईल. हे प्रदर्शन ५ ते ७ डिसेंबर दरम्यान चालेल.
पोर्तुगीज चित्रपट महोत्सव दि. ८, ९ व १० डिसेंबरला मॅकेनिझ पॅलेसमध्ये आयोजिला आहे. यात नलीनी एल्विनो डिसोझा व प्रा. डेल्फीम कोरिया डिसिल्वा यांनी निवडलेले इंडो-पोर्तुगीज चित्रपटांचा समावेश असेल.