गोवा अबकारी खात्याची नाचक्की
By admin | Published: April 16, 2015 01:28 AM2015-04-16T01:28:27+5:302015-04-16T01:28:41+5:30
पणजी : गोव्याहून तेलंगणा येथे १ कोटी रुपयांची बनावट दारूचा पुरवठा केला जातो आणि गोव्याच्या अबकारी खात्याला याचा मागमूसही लागला नाही
पणजी : गोव्याहून तेलंगणा येथे १ कोटी रुपयांची बनावट दारूचा पुरवठा केला जातो आणि गोव्याच्या अबकारी खात्याला याचा मागमूसही लागला नाही. तेलंगणा अबकारी खात्याने गोव्यात येऊन या प्रकरणातील संशयितास ताब्यात घेऊन चौकशीस नेले. या प्रकारामुळे अबकारी खात्याबरोबरच गोवा सरकारचीही नाचक्की झाली आहे.
खोर्ली-म्हापसा येथील नॅशनल डिस्ट्रीलरीतून या दारूचा पुरवठा केला जात होता. दारूत नशा आणणारा बर्न्ट शुगर हा पदार्थ मिसळून त्याचा पुरवठा केला जात होता. हा प्रकार बराच काळ सुरू होता, अशी माहिती तेलंगणाच्या अबकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
तेलंगणा येथे बनावट दारूचे चार ट्रक पकडण्यात आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि ही दारू गोव्याहून पुरविली जात असल्याचे उघडकीस आले.
तेलंगणाचे अबकारी अधिकारी गोव्यात येऊन नॅशनल डिस्ट्रीलरीचे मालक नील मोंतेरो यांना पकडून घेऊन जाईपर्यंत गोव्याच्या अबकारी खात्याला या प्रकाराची भनकही लागली नव्हती, याची कबुली अबकारी आयुक्त मिनीन डिसोझा यांनी दिली. तेलंगणा पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतरच हे खात्याच्या लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. तस्करी रोखण्यासाठी तसेच बनावट दारू विक्री रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय अबकारी खात्याकडून केले जातात.
नॅशनल डिस्ट्रीलरीच्या आणखी एक प्रकरणाबाबत चौकशी सुरू आहे. चौकशीत दोषी आढळून आल्यास या कंपनीचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यात दारूच्या तस्करीचे प्रकार काही नवे नाहीत. बोगस दारूची निर्मिती करून त्याची विक्री करण्याचे प्रकार गोव्यात अनेकवेळा उघडकीस आले आहेत.
वास्को द गामा डिस्ट्रीलरीच्या नावाने उत्पादने करून इतर राज्यांत दारूची विक्री करण्याचे प्रकरण गोवा विधानसभेतही गाजले होते. त्यानंतर बोगस ब्रँड निर्मितीला आळा घालण्यासाठी बाटलीवर होलोग्राम छापण्याचाही सरकारचा प्रस्ताव होता; परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही.
(प्रतिनिधी)