Goa: तोतया आई- मुलाला बनावट पासपोर्टसहीत पकडले, यूएईला जाण्याचा करित होते प्रयत्न
By पंकज शेट्ये | Published: August 24, 2023 05:16 PM2023-08-24T17:16:06+5:302023-08-24T17:16:45+5:30
Goa: गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून बनावट पासपोर्टच्या आधारे युएई ला (युनायटेड अरब अमिरात) जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तोतया आई - मुलाला दाबोळी विमानतळ पोलिसांनी गुरूवारी (दि.२४) ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.
- पंकज शेट्ये
वास्को - गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून बनावट पासपोर्टच्या आधारे युएई ला (युनायटेड अरब अमिरात) जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तोतया आई - मुलाला दाबोळी विमानतळ पोलिसांनी गुरूवारी (दि.२४) ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. बनावट पासपोर्ट घेऊन विदेशात जाण्याच्या प्रयत्नात असलेले तोतया आई - मुलगा गुजरात येथील असल्याची माहीती दाबोळी विमानतळ पोलीसांना चौकशीत प्राप्त झाली.
दाबोळी विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर १२.०५ च्या सुमारास तो प्रकार उघडकीस आला. दाबोळी विमानतळावरून एअर इंडीया एक्सप्रेस विमानाने युएई जाण्याच्या प्रयत्नात असलेला यशकुमार पटेल (वय १८, रा: अहमदाबाद, गुजरात) आणि रश्मीका चौधरय्या (वय ३३, रा: गांधीनगर, गुजरात) यांचा इमीग्रेशन विभागाने पासपोर्ट तपासला असता त्यांचे पासपोर्ट बनावट असल्याचे उघड झाले. यशकुमार आणि रश्मीका यांनी तेथे मुलगा - आई असल्याचे सांगून बनावट पासपोर्टच्या आधारे विदेशात जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे तेथे झालेल्या चौकशीत उघड झाले. त्या दोघांनीही दुस-यांच्या पासपोर्टवर त्यांचा फोटो लावून आणि अन्य अयोग्य प्रकार करीत बनावट पासपोर्ट बनवून ते विदेशात जाण्याचा प्रयत्नात असल्याचे चौकशीत उघड झाले.
यशकुमार आणि रश्मीका बनावट पासपोर्ट घेऊन विदेशात जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाल्यानंतर पुनीत वजीर यांनी दाबोळी विमानतळ पोलीसांना लेखी तक्रार दिली. पोलीसांनी तक्रारीची दखल घेत यशकुमार आणि रश्मीका यांच्याविरुद्ध भादस ४६८, ४७१, ४१९, ४२० आरडब्ल्यु ३४ कलमाखाली आणि पासपोर्ट कायदा १९६७ च्या १२ कलमाखाली गुन्हा नोंद करून दोघांनाही ताब्यात घेतले. गुजरातहून गोव्यात आल्यानंतर दाबोळी विमानतळावरून बनावट पासपोर्ट घेऊन विदेशात जाण्याचा प्रयत्नात असलेल्या त्या दोघांनीही ते बनावट पासपोर्ट कुठे बनवले त्याबाबत पोलीसांकडून चौकशी चालू आहे. दाबोळी पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक संतोष गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.