गोव्यातील नऊ वर्षीय बालिकेला दुर्धर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 02:29 PM2018-06-26T14:29:34+5:302018-06-26T14:31:25+5:30

गोव्यातील तुये येथील डॉन बास्को हायस्कूलमध्ये चौथीत शिकत असलेली नऊ वर्षीय संस्कृती सुधाकर कांबळे हिला गुड पेस्चर सिंड्रोम (जीपीएस) या दुर्धर आजाराने ग्रासले आहे

Goa : Family of 9-yr old struggling to pay 3 lakh hospital bill | गोव्यातील नऊ वर्षीय बालिकेला दुर्धर आजार

गोव्यातील नऊ वर्षीय बालिकेला दुर्धर आजार

googlenewsNext

निवृत्ती शिरोडकर

पेडणे - गोव्यातील तुये येथील डॉन बास्को हायस्कूलमध्ये चौथीत शिकत असलेली नऊ वर्षीय संस्कृती सुधाकर कांबळे हिला गुड पेस्चर सिंड्रोम (जीपीएस) या दुर्धर आजाराने ग्रासले आहे. हा आजार लाखांमध्ये एका व्यक्तीला होतो. या आजाराची संस्कृती ही गोव्यातील पहिली आणि देशातील 25वी रुग्ण आहे. सुधाकर कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात संस्कृतीची परीक्षा होती. परीक्षेला जाताना तिला चक्कर येत असे. तसेच उलटी होत होती. पुढे हा प्रकार आणखी वाढला. ब-याच चाचण्या केल्या. तरीही अहवाल सामान्य आल्याने किडनीचा छोटासा तुकडा काढून मणिपाल येथे चाचणीसाठी पाठविण्यात आला. 12 दिवसांनी अहवाल आला, त्यावेळी तिला गुड पेस्चर सिंड्रोम हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले.

सरकारी हॉस्पिटलमध्ये या रोगावर उपचार केले जात नाहीत. त्यामुळे जुने गोवे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेले तीन महिने उपचार सुरू केले. अधूनमधून रक्त डायलेसिस करणे सुरू होते. शनिवार (23 जून)  तिला डिस्चार्ज दिला; परंतु जोपर्यंत हॉस्पिटलचे साडेतीन लाख रुपयांचे बिल फेडले जात नाही, तोपर्यंत तिला घरी जायला हॉस्पिटल व्यवस्थापन समितीने हरकत घेतली. या संदर्भात तिच्या वडिलांनी आर्थिक मदतीची गरज असल्याचा संदेश सोशल मीडियावर टाकला आणि मदतीचे हात पुढे आले. शिरगाळ-धारगळ येथील युवा उद्योजक जीत आरोलकर यांनी १ लाख ७१ हजार रुपयांची मदत केली. चाईल्ड केअर संस्थेनेही मदतीचा हात दिला. सरकारने दीनदयाळ आरोग्य विमा योजनेद्वारे पूर्ण रक्कम दिली असती, तर मदतीसाठी हात पसरण्याची वेळ आली नसती, असे कांबळे म्हणाले. 

दरम्यान, कांबळे कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बेताचीच असून तिचे वडील सुधाकर कांबळे यांनी पुढील उपचारांसाठी दात्यांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले आहे.

किडनी बदलावी लागणार?

संस्कृती हिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांत तिच्या किडन्यांनी उपचारांना साथ दिली, तर ठीक आहे. अन्यथा दोन महिन्यांनंतर किडनी बदलावी लागेल. तशी स्थिती उद्भवल्यास पैसे कुठून आणावेत, या विवंचनेत कांबळे कुटुंबीय आहेत.

काय आहे हा रोग?

गुड पेस्चर सिंड्रोम (जीपीएस) हा अत्यंत दुर्मिळ रोग असून त्वरित योग्य उपाय न झाल्यास घातक ठरू शकतो. अशा प्रकारचा रोग झालेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती स्वत:च्याच शरीरातील पेशी नष्ट करतात. विशेषत: मूत्रपिंड व फुप्फुसांवर हल्ला करतात. योग्य उपचाराने तो लवकरात लवकर म्हणजे काही आठवड्यांत बराही होऊ शकतो किंवा २ वर्षांपर्यंत विलंबही लागू शकतो; परंतु जितक्या लवकर बरा होईल, तितके मूत्रपिंड व फुप्फुसे शाबूत राहण्याची अधिक शक्यता असते. अशा प्रकरणात जगण्याची शक्यता ८० टक्के इतकी आहे.

Web Title: Goa : Family of 9-yr old struggling to pay 3 lakh hospital bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा