गोवा: इसिसच्या "मृत" म्होरक्याकडून महिला डेंटिस्ट्सना धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 07:04 PM2017-07-18T19:04:57+5:302017-07-18T20:57:16+5:30
गोव्यातील कलिंगुट-कंडोलियम बिच परिसरातील महिला दंतचिकित्सकांना धमकी, पैसे न दिल्यास 6 गोळ्या शरीरात उतरवू...
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 18 - गोव्यातील महिला दंतचिकित्सकांना इसिस या दहशतवादी संघटनेकडून धमकी मिळाली आहे. अबू मुसाब अल-झारकवी या इसिसच्या दहशतवाद्याच्या नावाने महिला दंतचिकित्सकांना धमकी मिळाली आहे. विशेष म्हणजे 2006 साली अबू मुसाब अल-झारकवी याचा खात्मा करण्यात आला होता, त्यावेळी इसिसचा म्होरक्या अशी त्याची ओळख होती. पत्राद्वारे मिळालेल्या या धमकीत 1 ते 2 कोटी रूपयांची मागणी या महिला दंतचिकित्सकांकडे करण्यात आली आहे.
गोव्यामध्ये डेंटिस्ट इंडस्ट्रीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. युरोपमधील इतर राष्ट्रांपेक्षा गोव्यामध्ये दातांच्या उपचारासाठी खर्च कमी येतो, त्यामुळे येथे उपचारासाठी येणा-या विदेशी पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. पर्यटनाच्या सिझनमध्ये येथे येणा-या विदेशी पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे येथील डेंटिस्ट्सच्या कमाईतही वाढ होत आहे. यामुळेच धमकी मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोव्यातील कलंगुट-कंडोलियम बिच परिसरातील महिला दंतचिकित्सकांना ही धमकी मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये किमान पाच महिलांना धमकीचं पत्र मिळाल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं. अबु झरकावी याच्या नावाने धमकीचे दोन पत्र मिळाले, त्यामध्ये दोन कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास 6 गोळ्या शरीरात उतरवू अशी धमकी देण्यात आली आहे, अशी माहिती आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना रचना फर्नांडिस यांनी दिली. इतकंच नाही तर दवाखान्याबाहेर फिरताना पांढ-या रंगाचे कपडे घालावेत म्हणजे तुम्ही खंडणी देण्यास तयार असल्याचंही म्हटलं होतं असं फर्नांडिस म्हणाल्या. गोव्या सारख्या राज्यात दंतचिकित्सकांना अशा प्रकारच्या धमक्या मिळणं धक्कादायक असल्याचंही त्या म्हणाल्या. फर्नांडिस यांना मे महिन्यात पहिल्यांदा धमकी मिळाली. त्यानंतर कलंगुट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
""झारकवी याचा मृत्यू झालाय हे आम्हाला माहितीये. पण त्याचं नाव वापरून कोण धमक्या देतंय याबाबत आमची सखोल चौकशी सुरू आहे, हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतलं असून दंतचिकित्सालयांच्या बाहेर रेकी वाढवली आहे"", असं कलिंगुट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितलं.