गोव्याचा धसका, बेळगाव पोलीस तपासनाका उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 01:38 PM2018-08-10T13:38:02+5:302018-08-10T13:38:52+5:30
म्हादई पाणीप्रश्नी गोवा व कर्नाटकमधील वादाला वेगवेगळी वळणे प्राप्त होऊ लागली आहेत.
पणजी : म्हादई पाणीप्रश्नी गोवा व कर्नाटकमधील वादाला वेगवेगळी वळणे प्राप्त होऊ लागली आहेत. कणकुंबी परिसरात गोव्याचे मंत्री, जलसंसाधन खात्याचे अधिकारी वगैरे कळसा-भंडुरी प्रकल्पाचे कर्नाटकचे काम कुठे व किती प्रमाणात चालले आहे हे पाहण्यासाठी येतात हे लक्षात घेऊन बेळगाव पोलिसांनी कळसा-भंडुरी कामाच्या परिसरात तपास नाका उभा करण्याचे ठरवले आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका घटनेनंतर कर्नाटक बेळगाव पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. म्हादई नदीचे पाणी वळविले जाऊ नये म्हणून गोवा राज्य कायम प्रयत्न करत आले आहे. कळसा-भंडुरी प्रकल्प हा म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळविणारा प्रकल्प आहे. कर्नाटकने कशाचीच पर्वा न करता त्या प्रकल्पाचे काम पुढे नेले व पाणीही वळविले गेले असे गोवा सरकारच्या यंत्रणोचे म्हणणे आहे. गोवा सरकारने याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिकाही सादर केली आहे.
दोन दिवसांपूर्वी प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी कर्नाटकच्या हद्दीत म्हणजे खानापुर तालुक्यात गोव्याच्या जलसंसाधन खात्याचे वरिष्ठ अभियंते व अन्य कर्मचारी मिळून एकूण आठजणांचे पथक गेले होते. तिथे बेळगावच्या पोलिसांनी त्यांना अडवून त्यांची बरीच चौकशी केली. पोलिसांसोबत त्यांचे फोटोही काढून घेतले असे गोव्याचे जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर यांचे म्हणणे आहे. याविरुद्ध बेळगाव पोलिसांविरुद्ध काय कारवाई करता येईल याविषयी मंत्री पालयेकर यांनी राज्याचे अॅडव्हकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांच्याशी चर्चा केली आहे.
बेळगाव पोलिसांचे म्हणणे आहे, की त्यांनी गोव्याच्या अधिकाऱ्यांना गैरवागणूक दिलेली नाही. म्हादईचा विषय हा नाजूक आहे व त्यामुळे गोव्याचे मंत्री किंवा अधिकारी जर कळसा-भंडुरी कामाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तपास नाका उभा केला जाईल. म्हादई समर्थक आंदोलकांनी गोव्याच्या अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना त्रास करू नये म्हणून तपासनाका उभा करणे गरजेचे आहे. गोव्याचे जलसंसाधन अधिकारी पूर्वकल्पना न देता कोणत्याहीवेळी कळसा-भंडुरी कामाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येतात असे तेथील पोलिसांना वाटते. यापुढे जर यायचे झाले तर बेळगावच्या पोलीस आयुक्तांची व प्रशासनाची परवानगी घेऊन या असा सल्लाही गोव्याच्या पथकाला दोन दिवसांपूर्वी कणकुंबी येथे दिला गेला.