गोवा : नवेवाडे येथे आग लागून घरांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 07:34 PM2019-01-15T19:34:22+5:302019-01-15T19:37:42+5:30
नवेवाडे येथे भाड्याने राहणाऱ्या ललीता नारायण यांच्या घराला आग लागून 3.30 लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून अजूनपर्यंत वास्को भागातील विविध ठिकाणावरील घरांना आग लागण्याची ही तिसरी घटना आहे.
वास्को: नवेवाडे येथे भाड्याने राहणाऱ्या ललीता नारायण यांच्या घराला आग लागून 3.30 लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून अजूनपर्यंत वास्को भागातील विविध ठिकाणावरील घरांना आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. ललीता नारायण हिच्या घराला लागलेल्या आगीत तिच्या घराच्या एका खोलीतील सर्व सामान जळून खाक होण्याबरोबरच छप्पराची मोठी नुकसानी झाली आहे.
वास्को अग्निशामक दलाचे अधिकारी फ्रांन्सिस्को मेंडीस यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ९.४० वाजता आगीची घटना घडली. नवेवाडे येथील मज्जीत जवळ असलेल्या नाजरेत रिबेलो यांच्या मालकीच्या घरात ललीता व तिचा मुलगा राहतो. ललीता हीच्या बंद घराच्या छप्परातून धूर व आगीचे लोळ येत असल्याचे शेजा-यांना दिसून येताच त्यांनी त्वरित अग्निशामक दलाला या घटनेबाबत माहिती दिली. तसेच शेजा-यांनी ह्या घराला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न चालू केले. वास्को अग्निशामक दलाच्या दोन व गोवा शिपयार्डच्या एका अग्निशामक बंबाने त्वरित घटनास्थळी दाखल होऊन येथे लागलेली आग विझवण्याच्या कामाला सुरवात केली.
सुमारे एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर येथे लागलेली आग विझवण्यास दलाच्या जवानांना यश आले, मात्र तोपर्यंत ललिता यांच्या घराच्या एका खोलीतील पूर्ण सामान जळून खाक झाले होते. या घराच्या छप्पराचे मोठे नुकसान झाले असल्याचे मेंडीस यांनी सांगून सामानाची व घराची मिळून साडेतीन लाख रुपयांची नुकसानी झाल्याचे कळविले. या आगीची झळ बाजूला लागून असलेल्या मिंगेल रिबेलो यांच्या घराला लागल्याने त्यांचे सुमारे दिड लाख रुपयांची नुकसानी झालेली असल्याचे मेंडीस यांनी माहितीत पुढे सांगितले. घटनेच्या वेळी ह्या घरात कोणीही नसल्याने सुदैवाने येथे होणारी जीवितहानी टळली. ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी घरातून बाहेर निघताना येथे कदाचित पेटवून ठेवलेला दिवा बंद केला नसल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घराच्या आजूबाजूला मोठी लोकवस्ती असून वेळेवरच दलाच्या जवानांनी आग विझवल्याने येथे होणारी लाखो रुपयांची मालमत्ता बचावली. येथे लागलेल्या आगीचे नेमके कारण काय याबाबत अग्निशामक दलाचे अधिकारी तपास करीत आहेत.
3 जानेवारीला बायणा येथे राहणा-या आलेक्सो डी’सोझा यांच्या घराला रात्रीच्या वेळी आग लागून एका खोलीतील सर्व सामान जळून खाक झाले. ह्या घटनेत त्यांना सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. यानंतर ११ जानेवारीला रात्रीच्या वेळी एमपीटी मैदानाच्या मागे असलेल्या अहमद शेख यांच्या घराला आग लागून घरातील संपूर्ण सामानासहीत त्यांचे घरही भस्म झाले. यात शेख यांच्या कुटुंबाला दहा लाखाहून अधिक नुकसान सहन करावे लागले असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिका-यांनी दिली. सदर तीन घटनांपैकी दोन मध्ये घरात लावण्यात आलेल्या दिव्यामुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने ह्या तीनही आगीच्या घटनेत कुठल्याच प्रकारची जीवित हानी झाली नाही.