गोवा : ओजस्वीने नासात जाण्यासाठी गाठला पहिला टप्पा, कल्पना चावला शिष्यवृत्तीत ठरली यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 03:01 PM2018-01-24T15:01:50+5:302018-01-24T15:11:32+5:30
हरियाणाच्या कर्नालसारख्या लहानशा खेडयात जन्मलेल्या कल्पना चावला या मुलीने आकाशाच्यापलिकडे ता-यांच्या पार काय आहे हे पाहण्याचे स्वप्न लहानपणी पाहिले आणि ते स्वप्नच तिला अंतराळात घेऊन गेले.
मडगाव - हरियाणाच्या कर्नालसारख्या लहानशा खेडयात जन्मलेल्या कल्पना चावला या मुलीने आकाशाच्यापलिकडे ता-यांच्या पार काय आहे हे पाहण्याचे स्वप्न लहानपणी पाहिले आणि ते स्वप्नच तिला अंतराळात घेऊन गेले. कुंकळ्ळीतील ओजस्वी सतीश फळदेसाई या तेरा वर्षाच्या मुलीनेही कल्पना चावलासारखे स्वप्न पाहिले असून तीने हे स्वप्न पूर्णत्वास आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. ओजस्वीने कल्पना चावला आंतराष्ट्रीय शिष्यवृत्तीचा पहिला टप्पा पार केलेला असून दुसा-या टप्यात यशस्वी झाल्यास तिला अमेरिकेतल्या अंतराळ संशोधन केंद्र असलेल्या नासाला भेट देण्याची व नासात शिकण्याची संधी प्राप्त होणार आहे.
ओजस्वी फळ देसाईने ऑनलाईन पद्धतीनं सदर शिष्यवृत्तीसाठी परीक्षा दिली होती. तिचे नाव हजारो विद्यार्थ्यांमधून निवडण्यात आले असून आणखी एक ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तिचे नासात जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. दै.लोकमतशी बोलताना ओजस्वीने सांगितले की ती नासात जाण्यात अत्यंत उत्साहित असून पुढची पायरी पार करण्याचा असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. मी माझे लक्ष्य साकार करण्यासाठी अथक परिश्रम घेत असून शिकण्याबरोबरच जगा वेगळे काहीतरी करावे या जिद्दीनं प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते असे तीने सांगितले आहे.
ओजस्वी फळदेसाई ही मडगावच्या विद्या विकास अकादमीत सातवीत शिकत आहे. तिचे वडील डॉ.सतीश फळ देसाई यांचा कुंकळ्ळीत दवाखाना असून आई तनुजा फळदेसाई या काणकोणच्या मल्लिकाजरुन महाविद्यालयात व्याख्याता आहेत. तिचा मोठा भाऊ वैद्यकिय शास्त्रचे शिक्षण घेत आहेत. ओजस्वी फळ देसाई हिला अभ्यासाबरोबरच विज्ञान, गणित व संशोधनात मोठी रुची आहे. तिला बॅडमिटन व बुद्धीबळ खेळात विशेष रुची आहे. ओजस्वीने हल्लीच आंतराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी विज्ञान मंथन या स्पर्धेत तिसरा देश पातळीवर तिसरा क्रमांक पटकावला होता. ओजस्वीला पटाया येथे झालेल्या आंतराष्ट्रीय पान पेसिफिक स्पर्धेतही बक्षीस प्राप्त झाले होते. ओजस्वीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुंकळ्ळी नागरिक कृती समिती, कुंकळ्ळी मराठा समाज व इतर सामाजिक व शैक्षणिक संस्थानी ओजस्वीच्या या यशाबद्दल कौतुक केले असून तिला पुढील यशाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.