आयात बंदीमुळे गोव्यात मासे महागले, मासळीच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 06:49 PM2018-11-01T18:49:33+5:302018-11-01T19:18:13+5:30
मासे आयात बंदीमुळे गोव्यात माशांचे दर कडाडले आहेत.
मडगाव - मासे आयात बंदीमुळे गोव्यात माशांचे दर कडाडले आहेत. इसवण 680 रुपये किलो, बांगडे 900 रुपये पाटली एवढेच नव्हे तर ताल्र्याचा पाटलीचाही दर 400 रुपये. बाहेरुन येणाऱ्या मासळीच्या आयातीवर बंदी घातल्यावर गुरुवारी पहिल्याच दिवशी या निर्णयाचा फटका काय बसणार याची प्रचिती ग्राहकांना आली. मासळीचे दर किमान 30 टक्क्यांनी वाढलेले गुरुवारी मडगावच्या बाजारपेठेत दिसून आले.
मडगाव ही गोव्यातील मासळीची प्रमुख बाजारपेठ असून उत्तर गोव्यातील बडी हॉटेलेही मडगावातूनच मासळी खरेदी करतात. दर दिवशी मडगावच्या घाऊक मासळी बाजारात 70 ते 90 टन मासळीची उलाढाल होते. मात्र गुरुवारी केवळ गोव्याच्या रांपणीचे आणि ट्रॉलरचेच मासे बाजारात आल्याने माशांची टंचाई दिसून आली.
गुरुवारी सकाळी घाऊक मासळी बाजार एकदम थंड पडलेला दिसत होता. ज्या ठिकाणी घाऊक विक्री होत होती त्या ठिकाणी गुरुवारी किरकोळ मासे विक्री केली जात असल्याचे चित्र दिसत होते. बांगडे, तार्ले, सुगंटे व काही प्रमाणात इसवणची विक्री केली जात होती. मासे महाग असतानाही लोकांच्या मात्र त्यावर उडय़ा पडत होत्या.
मडगावच्या किरकोळ मासळी बाजारातही इसवण, सुगंटे, कुल्ल्र्या व ताल्र्याची आवक होती. मात्र एरव्ही 500 ते 550 रुपये किलो या दराने मिळणारा इसवण 680 रुपयावर पोहोचला होता. तर 150 रुपये किलो असलेली माणकी 300 रुपयांवर पोहोचली होती. मडगाव मासळी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष फेलीक्स गोन्साल्वीस यांनी, बाजारात मासळी नसल्याने भाव वाढले आहेत आणि भाव वाढल्याने ग्राहकांनाही ते परवडना सारखे झाले आहेत अशी माहिती दिली. बाहेरच्या राज्यातील मासळी न आल्यास ही परिस्थिती अधिकच बिकट होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.