गोव्यात मासेमारीवर परिणाम, समुदात पाणीपातळी वाढल्याने मच्छिमारांमध्ये भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 01:55 PM2018-10-11T13:55:16+5:302018-10-11T13:58:10+5:30
खोल समुद्रात घोंघावत असलेले चक्रीवादळ तसेच पाण्याची पातळी वाढल्याने मच्छिमारी ट्रॉलर किनाऱ्यावर परतले असून गोव्यात मासेमारी ठप्प झाली आहे. हवामान वेधशाळेने मच्छिमारांना सतर्कतेचा आदेश दिला आहे.
पणजी : खोल समुद्रात घोंघावत असलेले चक्रीवादळ तसेच पाण्याची पातळी वाढल्याने मच्छिमारी ट्रॉलर किनाऱ्यावर परतले असून गोव्यात मासेमारी ठप्प झाली आहे. हवामान वेधशाळेने मच्छिमारांना सतर्कतेचा आदेश दिला आहे. बुधवारी खास करून दक्षिण गोव्यातील अनेक किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे घबराट निर्माण झाली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या लुबान या चक्रीवादळाचा हा परिणाम होता. यामुळे मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हवामान वेधशाळेने या वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी न देण्याचा इशारा दिला आहे. तो आधी १२ ऑक्टोबरपर्यंत होता, परंतु आता आणखी दोन दिवसांनी मुदत वाढवण्यात आली असून १४ ऑक्टोबरपर्यंत हा इशारा कायम आहे. हवामान वेधशाळेचे संचालक एम. एल. साहू यांच्या म्हणण्यानुसार या वादळाची तीव्रता कमी होत जाणार आहे.
गोव्यातील सर्वात मोठी मच्छिमारी जेटी असलेल्या मालिम जेटीवरील ट्रॉलरमालक तथा मांडवी फिशरमेन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष सीताकांत परब म्हणाले की, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यावरुन गेल्या ७ ऑक्टोबरपासून मच्छीमारी ट्रॉलर बंद आहेत. सुमारे ७० टक्के ट्रॉलर्स जेटीवर नांगर टाकून आहेत. जे काही ट्रॉलर्स खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते ते मुरगाव बंदरात किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी नांगर टाकून आहेत. मासेमारी ठप्प झाल्याने जेटीवर मासळीची आवक फारच घटली आहे.
चक्रीवादळ खोल समुद्रात घोंघावत असले तरी किनाऱ्यावर त्याचा परिणाम जाणवत आहे. किनाऱ्यावर भरतीच्या वेळी आणि ओहोटीच्या वेळी पाण्याचा प्रवाह प्रचंड असतो. त्यामुळे यांत्रिकी होड्यांद्वारे केली जाणारी मच्छिमारीही ठप्प झाली आहे. भरतीच्या वेळी किनाऱ्यावर मोठ्या लाटा दिसून येतात. पाण्याची पातळी अधून मधून वाढलेली असते. पुढील दोन दिवस मासेमारी शक्य नाही हवामान वेधशाळेने येत्या रविवार १४ ऑक्टोबरपर्यंत मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मालिम व्यतिरिक्त कुटबण, शापोरा, कुठ्ठाळी, वास्को, बेतुल या ठिकाणीही मोठ्या मच्छिमारी जेटी आहेत तेथेही मासेमारी ठप्प झाली आहे