गोव्यात मासेमारी बंद पण रस्त्यांवर मासे विक्री सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 05:08 PM2020-04-04T17:08:48+5:302020-04-04T17:09:05+5:30
मासेमारी जाहीर केली असली तरी मडगावात कित्येक ठिकाणी रस्त्यावर माश्यांची विक्री चालूच होती. 200 रुपयांना चार बांगडे या दरात ही मासेविक्री चालू होती.
मडगाव - सरकारने राज्यात संपूर्ण मासेमारी जाहीर केली असली तरी मडगावात कित्येक ठिकाणी रस्त्यावर माश्यांची विक्री चालूच होती. 200 रुपयांना चार बांगडे या दरात ही मासेविक्री चालू होती. कुटबण येथे मासेमारी बोटी तडीवर आणून ठेवल्या असल्या तरी कित्येक मासे विकणारे एजंट आपल्या माणसांमार्फत रस्त्यावर मासेविक्री करत असून मडगावचे मुख्य मासळी मार्केट जरी बंद असले तरी पाजीफोंड, दवरली, सिने लता परिसर, रावणफोंड या भागात दुचाकीवर माशाच्या पाट्या लावून मासेविक्री चालू होती.
कुंकळी, असोळणा या भागातही रस्त्यावर बसणाऱ्या मासे विक्रेत्याकडे बांगडे व सुंगटे उपलब्ध होती. एसजीपीडीएचे अध्यक्ष असलेले बाबशान डीसा यांच्या नुवे मतदारसंघातही लोकांना मासे मिळाले. या बद्दल विचारले असता माहिती मिळाली की मासेविक्री करणाऱ्या एजंटानी आपल्या डीप फ्रिजमध्ये ठेवलेले मासे आता बाहेर काढले आहेत. काही दिवसापूर्वी मासे घेऊन आलेल्या बोटींच्या मालकांना पकडलेले मासे फॅक्टरीत विकण्याचा आदेश दिला होता आता तेच मासे बाहेर येत असल्याचा आरोप काही जणांनी केला .
अंडी अव्वाच्या सव्वा दारात
अंड्यांच्या आयातीवर बंदी घालण्याच्या चार दिवसांपूर्वी काही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अंडी विकत घेतली होती. 40 रुपये किलो या दराने विकत घेतलेली ही अंडी काही व्यापाऱ्यांनी 60 ते 80 रुपये या दराने लोकांना विकली.
मडगावचे माजी नगराध्यक्ष सवियो कुटीन्हो यांनी हा प्रकार म्हणजे संचारबंदीच्या काळात केलेला काळा बाजार असा आरोप केला. चार दिवसानंतर बंदी येणार याची माहिती उद्योजकांना असल्यामुळे त्यांनी कमी किमतीत ती इतर विक्रेत्यांना विकून आपला स्टॉक संपविला तर काही जणांनी तीच अंडी बाजारात आणून डबल भावाने विकतानाच आपल्यामुळेच लोकांना अंडी मिळाली असा भावही खाल्ला असे ते म्हणाले.