गोव्यातील फॉरवर्डचे आमदार शिवसेनेच्या आश्रयास, विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 10:46 PM2019-11-29T22:46:33+5:302019-11-29T22:48:21+5:30
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले आमदार विजय सरदेसाई, विनोद पालयेकर व जयेश साळगावकर हे राऊत यांना भेटले.
पणजी : सत्तेपासून दूर असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने नवी उचापत करताना शुक्रवारी मुंबईत शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. गोव्यात सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची प्रक्रिया या भेटीद्वारे सुरू झाल्याचे राजकीय क्षेत्रत मानले जाते पण गोव्यात शिवसेनेचा एकही आमदार नसतानाही राऊत यांनी गोव्यातील प्रमोद सावंत सरकार पाडण्याच्यादृष्टीने सूतोवाच केले. राऊत यांनी गोमंतकीयांचे मनोरंजन केले अशी प्रतिक्रिया सरकारमधील काही मंत्र्यांनी व्यक्त केली.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले आमदार विजय सरदेसाई, विनोद पालयेकर व जयेश साळगावकर हे राऊत यांना भेटले. महाराष्ट्राप्रमाणोच गोव्यातही सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे व गोव्यातील भाजप सरकारला हद्दपार करायला हवे असे सरदेसाई म्हणाले. राऊत यांनी प्रसार माध्यमांकडे आपली भूमिका मांडली. गोव्यातही लगेच राजकीय भूकंप होईल. गोव्यात विरोधकांची नवी आघाडी आकार घेत आहे, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रानंतर आम्ही गोव्यातही बदल घडवून आणू व मग पूर्ण देशात बदल होईल, असेही राऊत यांनी नमूद केले. आपण गोव्यातील मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याशीही बोलल्याचे राऊत यांनी सांगितले.
सरदेसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांचीही मुंबईत भेट घेतली. गोव्यातील प्रमोद सावंत सरकार जायला हवे. आमचा भाजपने विश्वासघात केला आहे. आम्ही सगळे विरोधक एकत्र येऊ आणि सरकारही पाडू, असे सरदेसाई यांनी जाहीर केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा यांनी गोव्यातील सरकार पाडण्याची चर्चा पटेल यांच्यासोबत झाली नाही, तसा प्रश्नही आला नाही असे पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप यांनी सरकार पाडण्याची योजनाच नाही असे पत्रकारांना सांगितले. पटेल यांच्याशी त्याविषयी चर्चाही झाली नाही, असे जुङो फिलिप म्हणाले. गोव्यातील बहुजन समाजाचे सरकार प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे काम करते. ते का पाडायला हवे अशी विचारणा आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली आहे. पवार कधीच प्रमोद सावंत यांच्यासारख्या चांगल्या मुख्यमंत्र्याचे सरकार पाडणार नाही, असे आलेमाव म्हणाले. म्हादई नदीच्या पाण्याच्या विषयाबाबत सरकारने गोमंतकीयांचे हित जपले नाही. हे सरकार विश्वासघात करून अधिकारावर आले. प्रमोद सावंत सरकार स्वत:चाच स्वार्थ पाहते. हे सरकार जायला हवे. महाराष्ट्राच्या धर्तीवर आम्ही गोव्यात सगळे विरोधक एकत्र होऊ. गोव्याला चांगला पर्याय देऊ.
- विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड अध्यक्ष
.................................
संजय राऊत मीडियाशी बोलले व त्यांनी सर्व विरोधक एकत्र यायला हवे अशी कल्पना मांडली. मी ही कल्पना मगो पक्षाच्या केंद्रीय समितीसमोर ठेवीन. आम्ही अजून काही निर्णय घेतलेला नाही. आम्हाला घाई नाही. सगळे विरोधक एकत्र यायला हवे हे खरे पण राऊत गोव्यात आल्यानंतर माङयाशी सविस्तर बोलतील.
- सुदिन ढवळीकर, मगोपचे नेते
....................................
गोवा फॉरवर्डचे सरदेसाई सध्या स्वत:चे अस्तित्व राखण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे शिवसेनेसह अन्य कुणालाही शरण जाण्याची त्यांची तयारी आहे. त्यांना गोवा पूर्णपणो ओळखतोय. महाराष्ट्रात सगळे विरोधक नवे सरकार घडविण्यासाठी एकत्र आले, कुणाचे सरकार पाडण्यासाठी एकत्र आले नाही.
- ट्रोजन डिमेलो, काँग्रेस प्रवक्ते