गोवा फॉरवर्डमध्ये उपाध्यक्षाचे बंड, सरदेसाई यांच्यावर ट्रोजनचा लेटरबॉम्ब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 08:08 PM2018-10-08T20:08:55+5:302018-10-08T20:11:03+5:30
फॉर्मेलिन माशांच्या विषयावरून आयवा फर्नाडिस ह्या महिला अधिकाऱ्याचा जो छळ चालला आहे, तो विषय हाती घेत थेट फॉरवर्डचे अध्यक्ष व कृषी मंत्री विजय सरदेसाई यांच्यावर लेटर बॉम्ब टाकला आहे.
पणजी : गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थापन झालेल्या आणि पहिल्याच निवडणुकीत तीन उमेदवार निवडून येऊन तिघेही मंत्री बनलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षात उपाध्यक्ष ट्रोजन डिमेलो यांनी सोमवारी बंडाचे निशाण फडकविले आहे. फॉर्मेलिन माशांच्या विषयावरून आयवा फर्नाडिस ह्या महिला अधिकाऱ्याचा जो छळ चालला आहे, तो विषय हाती घेत थेट फॉरवर्डचे अध्यक्ष व कृषी मंत्री विजय सरदेसाई यांच्यावर लेटर बॉम्ब टाकला आहे.
दोन महिन्यांपूर्वी मडगावला काही एफडीए अधिकाऱ्यांनी छापा टाकून माशांची तिथेच चाचणी केली होती. त्यावेळी माशांमध्ये फॉर्मेलिन आहे, असा प्रथम अहवाल आयवा फर्नाडिस ह्या एफडीए अधिकाऱ्याने दिला होता. श्रीमती फर्नाडिस हिची मानसिक सतावणूक होत आहे व त्यामुळे तिला मानवी हक्क आयोगाकडेही धाव घ्यावी लागली आहे, असे डिमेलो यांनी मंत्री सरदेसाई यांना लिहिलेल्या पत्रत नमूद केले आहे. मंत्री सरदेसाई हे आयवाच्या सतवणुकीच्या विषयाबाबत गप्प का आहेत असा प्रश्न डिमेलो यांनी विचारला आहे. ही तर असवंदेनशीलता असून हे फट, फटिंग व फटिंगपण आहे अशी गंभीर टीप्पणी डिमेलो यांनी केली आहे.
डिमेलो यांनी गेल्या 5 रोजी मंत्री सरदेसाई यांना पत्र लिहिले. त्या पत्रला उत्तर न आल्याने त्यांनी 8 रोजी हे पत्र सर्व प्रसार माध्यमांनाही दिले. आयवा फर्नाडिस ह्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. मासळी माफीयांचा विषारी व गुन्हेगारी डाव आयवाने उघड केला होता, गोमंतकीयांच्या नजरेस आणला होता. या अधिकाऱ्याचा आता खूपच मानसिक छळ केला जात आहे. तुम्ही याविषयी घेतलेले मौन हे कानठळ्य़ा बसविणारे आहे व या चांगल्या अधिकाऱ्याच्या सतावणुकीशी तुम्हीही सहमत असल्याचे संकेत त्यातून मिळतात असे डिमेलो यांनी सरदेसाई यांना उल्लेखून पत्रत म्हटले आहे. या विषयाबाबत तुम्ही तुमची भूमिका मांडायला हवी. गोवा फॉरवर्ड पक्ष हा आता गोंय, गोंयकार व गोंयकारपणाचा राहिलेला नाही असे लोक उघडपणे बोलतात, असेही डिमेलो यांनी म्हटले आहे.