कोरोना महामारीत पालिका निवडणूक म्हणजे लोकांना धोक्याच्या खाईत लोटणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 04:26 PM2020-07-24T16:26:12+5:302020-07-24T16:26:18+5:30

विजय सरदेसाई : सरकारला लोकांच्या आरोग्याचे पडून गेलेले नाही हे पुन्हा सिद्ध

Goa Forward Party opposes to held municipal election in Goa during vividh pandemic | कोरोना महामारीत पालिका निवडणूक म्हणजे लोकांना धोक्याच्या खाईत लोटणे

कोरोना महामारीत पालिका निवडणूक म्हणजे लोकांना धोक्याच्या खाईत लोटणे

Next

मडगाव: गोव्यात कोरोना फैलावलेला असताना सरकार नगरपालिका निवडणूक घेण्याची तयारी करते ते पाहिल्यास हे सरकार जनतेला धोक्याच्या खाईत लोटू पाहते हे सिद्ध होते असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला असून आपल्या राजकीय आरोग्यापुढे या सरकारला सार्वजनिक आरोग्याचे फारसे पडून गेलेले नाही हे परत एकदा सिद्ध झाले आहे असे त्यांनी म्हटले आहे.

गोवा सरकारने ऑक्टोबर महिन्यात नगरपालिका निवडणूक घेण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. सध्या कोरोना गोव्यातील नगरपालिका क्षेत्रात पसरू लागला आहे, त्यावर सरकारला नियंत्रण मिळविता आलेले नाही. सध्या स्थगित ठेवलेली जिल्हा पंचायत निवडणूक कधी होणार हेही सरकार निश्चित करू शकलेले नाही. अशा परिस्थितीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत गोव्यातील कोविड स्थिती पूर्ण आटोक्यात आलेली असेल याची ग्वाही सरकार देऊ शकते का असा सवाल त्यांनी केला आहे.

 

पालिकांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपतो. हा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणूक घेणे आवश्यक असले तरी आणीबाणीच्यावेळी निवडणुका पुढे ढकलता येतात असे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सूचित केलेले आहे याकडे लक्ष वेधताना कोविड असताना निवडणूक घेतल्यास उमेदवार प्रचारासाठी लोकांच्या दारात पोहोचू शकतील का असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, गृहखात्याच्या निर्देशाप्रमाणे राजकीय एकत्रीकरणाला बंदी आहे. अशा परिस्थितीत निवडणूक कशी होऊ शकेल असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

भाजपाकडे गोव्यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत . त्यांच्या जोरावर सरकारला कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठीच त्यांनी आपल्या कार्यकात्याद्वारे सगळीकडे होमिओपॅथी औषधांचे वाटप सुरू केले आहे. सध्याच्या नगरमंडळांना लोकांनी नाकारावे यासाठी सरकारी नोकरांच्या वापर करून शहरातील कचरा व्यवस्थापन कोलमडून पाडले आहे. आता लवकरच पर्यटन प्रचाराच्या नावाखाली मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा उदो उदो करण्याची मोहीम सुरू होणार असल्याचे समजते. हे सारे पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केले जाते पण हे करताना सरकार आपल्याच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालत आहे  याची जाणीव त्यांना आहे का असा सवाल करीत या असंवेदनशील सरकारला जनताच वेळ आली की योग्य धडा शिकवेल असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Goa Forward Party opposes to held municipal election in Goa during vividh pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.