खलाशांना परत गोव्यात आणण्यासाठी गोवा फॉरवर्ड न्यायालयात जाणार- विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 10:46 AM2020-05-14T10:46:56+5:302020-05-14T10:47:26+5:30

गोमेकॉत आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना मृत्यू नेमका कुठल्या कारणाने आला त्याचीही न्यायिक चौकशी होण्याची गरज पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.

Goa Forward will go to court to bring the sailors back to Goa vrd | खलाशांना परत गोव्यात आणण्यासाठी गोवा फॉरवर्ड न्यायालयात जाणार- विजय सरदेसाई

खलाशांना परत गोव्यात आणण्यासाठी गोवा फॉरवर्ड न्यायालयात जाणार- विजय सरदेसाई

Next

मडगाव: ग्रीन झोनमधील गोवा अशी राज्य सरकारकडून घोषणा केली जात असतानाच राज्यात 7 पोझिटिव्ह प्रकरणे सापडल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा सुरक्षित हा दावाच मोडीत निघालेला असून, या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड पक्षाने आतातरी गोव्यात लोकांच्या व्यापक कोविड चाचण्या घ्यायला सुरुवात करा, अशी मागणी केली आहे. गोमेकॉत आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना मृत्यू नेमका कुठल्या कारणाने आला त्याचीही न्यायिक चौकशी होण्याची गरज पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.

दरम्यान विदेशात अडकलेल्या गोवेकरांना आणि खलाशांना गोव्यात परत कसे आणणार याबाबत सरकारकडून कसलीच स्पष्टता दिसत नाही हे जर असेच चालू राहिल्यास हा प्रश्न आम्ही उच्च न्यायालयात नेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. गोव्यात एक टक्का जनतेचीही तपासणी न करता गोवा हरित विभागातील राज्य असा प्रचार सध्या सरकार करीत आहे, त्यालाही त्यांनी आक्षेप घेताना यामुळे लोकांमध्ये सुरक्षेविषयी फाजील आत्मविश्वास तयार होईल  आणि  त्यातून गोव्याबाहेरून येणाऱ्या गोवेकराकडे आणि खलाशाकडे 'व्हायरसचे वाहक' या दृष्टिकोनातून बघण्याची वृत्ती वाढू शकेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. जर देशात इतर ठिकाणी अडकलेल्या गोवेकरांना जर ट्रेनमध्ये स्थान  मिळत नाही तर दिल्ली, गोवा रेलसेवा का सुरू केली आहे, असा सवाल केला आहे. गोमेकॉत भरती असलेल्या रुग्णांना मृत्यू कसा आला त्याचीही न्यायिक चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. सरकार याबाबत माहिती दडवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

अशा परिस्थितीत गोवा शालांत मंडळाने जाहीर केलेल्या परीक्षा ताबडतोब रद्द करण्यात याव्यात आणि गोवा कोरोनामुक्त अशी फसवी जाहिरात करण्याऐवजी व्यापक प्रमाणात लोकांच्या चाचण्या हाती घ्याव्यात आणि आवश्यक ती वैद्यकीय साधन सुविधा वाढवाव्यात,असे त्यांनी म्हटले आहे. वंदे भारत योजनेखाली दुसऱ्या टप्प्यातही दाबोळी विमानतळ खुला केला जाणार नाही यावर तीव्र टीका करताना राज्यातील लोकांची सुरक्षा हे राज्याचे आध्य कर्तव्य हे सरकारने विसरू नये, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Web Title: Goa Forward will go to court to bring the sailors back to Goa vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.