Goa: गोव्यातील 'एकमेव संजीवनी सहकारी साखर कामगारांना सरकारचा दिलासा, इथेनॉल प्रकल्पात सामावून घेणार
By किशोर कुबल | Published: August 9, 2023 11:32 PM2023-08-09T23:32:17+5:302023-08-09T23:32:47+5:30
Goa: कारखान्यातील कोणाही कामगाराला सेवेतून कमी केलेले नाही किंवा कमी केलेही जाणार नाही. या कामगारांना तेथे येणार असलेल्या इथेनॉल प्रकल्पात सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.
- किशोर कुबल
पणजी - गोव्यातील सहकार क्षेत्रात असलेल्या एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्याला 'मरणकळा' लागल्या असताना कारखान्यातील कोणाही कामगाराला सेवेतून कमी केलेले नाही किंवा कमी केलेही जाणार नाही. या कामगारांना तेथे येणार असलेल्या इथेनॉल प्रकल्पात सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.
रात्री उशिरा विधानसभेत कृषी, नागरी पुरवठा तसेच स्वतःकडे असलेल्या अन्य खात्यांच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना नाईक बोलत होते.
ते म्हणाले की, 'जी कंपनी इथेनॉल प्रकल्प थाटणार आहे, त्या कंपनीला या कामगारांना सेवेत घ्यावे लागेल. कामगारांवर अन्याय होणार नाही.' मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की,'प्रकल्पासाठी दोन वेळा निविदा काढल्या परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढल्या जातील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षात अन्य राज्यांमध्ये कुठेही मिळाला नाही एवढा भाव ऊसाला आम्ही दिला. प्रति तर ३ हजार रुपये दिले. शेतकऱ्यांची चिंता तसरकारला आहे.' मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ,खाजन जमिनींच्या बाबतीत ३६४ कोटी रुपये खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केलेला असून केंद्राच्या मंजुरीची आम्ही वाट पाहत आहोत. खाजन बांधांसंबंधी असलेले सर्व प्रश्न ही मंजुरी मिळाल्यानंतर मिटतील.'
विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांना वेळेवर सबसिडी मिळत नाही, ऊस उत्पादनांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका केली. नागरी पुरवठा खात्याच्या अनुदान मागण्यांवर बोलताना विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी रेशनवरील तांदळाला लागलेल्या किडीचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की स्वस्त धान्य दुकानांमधून सरकारने चांगल्या दर्जाचा तांदूळ पुरवावा. स्वस्त धान्य दुकानांची वेळच्यावेळी तपासणी करावी तसेच तेथे कीटकनाशके फवारणी वगैरे गोष्टी हाती घ्याव्यात. सहा महिन्यात सर्व ११ गोदामे तीही ३.५ कोटी रुपयांमध्ये दुरुस्त करण्याचे जी भाषा सरकार करत आहेत ती दिशाभूल करणारी आहे. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी तांदूळ गहू तस्करीचे मोठे प्रकरण उघड झाले. परंतु नागरिक पुरवठा खात्याने काहीच कारवाई केलेली नाही.'
सरदेसाई यांनी स्वस्त धान्य दुकानातील तांदळाची तीन वेगवेगळी पाकिटे सभागृहासमोर ठेवली. एक पाकीट मुख्यमंत्र्यांनी, एक नागरी पुरवठा खात्याच्या मंत्र्यांनी आणि एक नागरी पुरवठा संचालकांनी न्यावे आणि तांदूळ शिजवून बघावा. तो किती निकृष्ट दर्जाचा आहे, हे दिसून येईल असे सरदेसाई म्हणाले.