गोवा : किनारी भागात गोमंतकीयांच्या घरांचे रुपांतर काश्मिरींच्या व्यवसाय केंद्रांमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 12:31 PM2018-01-29T12:31:02+5:302018-01-29T12:32:41+5:30
उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये काश्मिरी व्यापा-यांची संख्या खूपच वाढत चालली आहे.
पणजी : उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये काश्मिरी व्यापा-यांची संख्या खूपच वाढत चालली आहे. 10 वर्षापूर्वी 10 ते 12 हजार काश्मिरी पूर्ण किनारपट्टीत व्यवसाय करताना आढळून यायचे. आता हे प्रमाण 40 हजारांच्या पुढे गेले आहे. गोमंतकीयांनी आपली घरे काश्मिरींना व्यवसाय करण्यासाठी भाडेपट्टीवर देणे सुरू केले आहे.
काश्मिरींनी प्रथम उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत आपले बस्तान मांडले. त्यानंतर दक्षिण गोव्यात काश्मिरी व्यवसायिकांची संख्या वाढू लागली. प्रस्तुत प्रतिनिधीने कोणकोण तालुक्यासह दक्षिण गोव्यातील अन्य काही किना-यांना भेट दिली असता हजारो काश्मिरी व्यवसायिक विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री करताना दिसून आले. बहुतांश काश्मिरी उत्तर गोव्यातही कपडे विक्रीचे काम करतात. दक्षिण गोव्याच्या राजबाग, पाळोळे, आगोंद या किना-यांवर बहुतांश काश्मिरी कपड्यांसह आकर्षक शोभेच्या वस्तू, विविध प्रकारच्या चहा यांची विक्री करतात.
गोमंतकीयांनी आपल्या घरचा पुढील भाग काश्मिरी व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी दिला असून घराच्या मागील भागात ही गोमंतकीय कुटुंबे राहतात. काही भागांत तर गोमंतकीयांनी किना-यांवरील आपली जुनी घरे सोडली व मडगाव आणि अन्य भागांमध्ये फ्लॅट घेऊन राहणो पसंत केले आहे. अशा गोमंतकीयांकडून किना-यांवरील पूर्ण घरे काश्मिरींना भाडेपट्टीवर दिली गेली आहेत.
विदेशी पर्यटकांसाठी अनेक काश्मिरी योगाचे वर्ग चालवतात. विदेशींना काही भागात योगाच्या नावाखाली काहीही शिकविले जाते अशा प्रकारच्या देखील तक्रारी येतात. स्थानिकांपेक्षा विदेशी पर्यटकच काश्मिरी उत्पादने व कपडे जास्त खरेदी करताना दिसून आले. दक्षिण गोव्याच्या किना-यांवर बहुतांश रशियन पर्यटकांची सध्या गर्दी आहे. राजबाग, पाळोळे व आंगोद या तीन किना-यांवर देशी पर्यटक संख्येने खूपच कमी आहेत. विदेशी पर्यटक हजारोंच्या संख्येने आढळून आले. काही काश्मिरी व्यक्ती रेस्टॉरंट्स चालवत आहेत तर काहींनी किना-यांवर लाकडी कॉटेजीस उभे करून तिथे विदेशी पर्यटकांची सोय केली आहे.
उत्तरेत कळंगुट, कांदोळी, बागा, हरमल, अंजुणा, सिकेरी या किना-यांवर किमान पंचवीस हजार काश्मिरी व्यवसाय करत आहेत. स्थानिक विरुद्ध काश्मिरी व्यवसायिक असे तंटे जास्त प्रमाणात अजून तरी गोव्यात घडत नाहीत. मात्र पूर्ण किनारपट्टी काश्मिरी व्यवसायिकांच्या ताब्यात कधी गेली ते गोमंतकीयांना कळले देखील नाही.