गोव्यात मंत्र्यांना मिळाली पूर्वीचीच खाती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 05:35 AM2019-03-22T05:35:51+5:302019-03-22T05:36:09+5:30

पर्रीकर मंत्रिमंडळ अस्तित्वात असताना सर्व मंत्र्यांना जी खाती दिली गेली होती, तीच खाती आता विद्यमान मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांना मिळणार आहेत.

 Goa got ministers in the past | गोव्यात मंत्र्यांना मिळाली पूर्वीचीच खाती

गोव्यात मंत्र्यांना मिळाली पूर्वीचीच खाती

googlenewsNext

पणजी : पर्रीकर मंत्रिमंडळ अस्तित्वात असताना सर्व मंत्र्यांना जी खाती दिली गेली होती, तीच खाती आता विद्यमान मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांना मिळणार आहेत. त्याविषयीची अधिसूचनाही राज्यपालांकडून मान्य होऊन आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून ही माहिती गुरुवारी प्राप्त झाली.
खातेवाटप न झाल्याने त्याविषयी मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. खातेवाटपासाठी विलंब का झाला ते काही मंत्र्यांना कळत नाही. कायदा खात्याकडे मुख्यमंत्र्यांनी फाइल पाठवली होती, अशीही चर्चा अधिकाऱ्यांच्या पातळीवर होती. या पार्श्वभूमीवर या प्रतिनिधीने मुख्यमंत्री सावंत यांना विचारले असता, ते म्हणाले की, सर्व मंत्र्यांना पूर्वीचीच खाती द्यावीत, असा निर्णय झालेला आहे. पर्रीकर मंत्रिमंडळ अधिकारावर असताना मंत्र्यांकडे जी प्रत्येकी तीन खाती होती, तीच खाती दिली जातील. त्याबाबतचे सगळे सोपस्कार आपण पार पाडले आहेत. आपण अधिसूचनेसाठी फाइल राज्यपालांकडे पाठवली व राज्यपालांकडूनही ती मंजूर होऊन आली. शुक्रवारी अधिसूचना बाहेर येईल व सर्व मंत्र्यांना त्या वेळी अधिसूचनेची प्रत मिळेल.
विजय सरदेसाई यांच्याकडे नगर नियोजन, मिलिंद नाईक यांच्याकडे नगरविकास, सुदिन ढवळीकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, माविन गुदिन्हो - पंचायत, बाबू आजगावकर - पर्यटन, नीलेश काब्राल - वीज, जयेश साळगावकर - गृहनिर्माण, विनोद पालयेकर - जलसंसाधन, रोहन खंवटे - महसूल, गोविंद गावडे - कला व संस्कृती, विश्वजीत राणे - आरोग्य अशा पद्धतीने खातेवाटप होणार आहे. याशिवाय पूर्वी जी अन्य दोन किंवा तीन खाती मंत्र्यांकडे होती, तीही त्यांना दिली जातील. याचा अर्थ असा की, मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे अर्थ, गृह, पर्सनल, खाण, वन, पर्यावरण, शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, उद्योग अशी अनेक महत्त्वाची खाती असतील.

मंत्र्यांची खाती

मुख्यमंत्री सावंत - अर्थ, गृह, पर्सनल, उद्योग, खाण, वन, शिक्षण, पर्यावरण
सुदिन ढवळीकर - सार्वजनिक बांधकाम, वाहतूक, नदी परिवहन व म्युझियम
विजय सरदेसाई - नगर नियोजन, कृषी, पुरातत्त्व, कारखाने व बाष्पक
बाबू आजगावकर - पर्यटन, क्रीडा, प्रिंटिंग अ‍ॅण्ड स्टेशनरी
रोहन खंवटे - महसूल, आयटी, रोजगार व मजूर
विश्वजीत राणे - आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, क्राफ्टमन ट्रेनिंग

गोविंद गावडे - अनुसूचित जमाती कल्याण, कला व संस्कृती, नागरी पुरवठा
माविन गुदिन्हो - पंचायत, शिष्टाचार, पशूसंवर्धन
जयेश साळगावकर - गृहनिर्माण, बंदर कप्तान, आरडीए
विनोद पालयेकर - जलसंसाधन, मच्छीमार, वजन व माप खाते
नीलेश काब्राल - वीज, सौर ऊर्जा, कायदा व न्याय
मिलिंद नाईक - समाज कल्याण, नगर विकास

Web Title:  Goa got ministers in the past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.