Goa : मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत अनेक मंत्री सैरभैर, सरकारी परिपत्रकाने वाढवला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:07 PM2018-11-15T12:07:19+5:302018-11-15T12:08:52+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दैनंदिन कामांमध्ये सक्रिय नाहीत, ते सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकत नाहीत, अधूनमधून त्यांना इस्पितळातही जाऊन यावे लागते या सर्व स्थितीत सध्या त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सैरभैर झालेले आहेत.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दैनंदिन कामांमध्ये सक्रिय नाहीत, ते सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकत नाहीत, अधूनमधून त्यांना इस्पितळातही जाऊन यावे लागते या सर्व स्थितीत सध्या त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सैरभैर झालेले आहेत. तशात वीजमंत्री निलेश काब्राल यांच्यामार्फतच यापुढे सर्व सरकारी फाईल्स, कागदपत्रे वगैरे जायला हवीत, असे परिपत्रक सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने जारी करून गोंधळ वाढविला. काही मंत्र्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवला आणि परिपत्रक मागे घेण्यास मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांना भाग पाडले आहे.
राज्यातील काही तालुक्यांत पिण्याचे पाणी बंद झालेले आहे, राज्यात मासळीच्या आयात बंदीवरून वाद पेटला आहे, खनिज खाणी बंद असल्याने राजकीय नेत्यांच्या घरांवर व कार्यालयांवर शेकडो खाण अवलंबित मोर्चे नेऊ लागले आहेत. पण या स्थितीत प्रशासनाची सगळी सूत्रे हाती घेऊन समस्यांवर कायमस्वरुपी उपाय काढणारा कोणीच नेता मंत्रालयात किंवा सचिवालयात नाही, असा अनुभव गोव्याला येत आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत जर खाणी सुरू झाल्या नाहीत, तर मगोप सरकारमधून बाहेर पडेल असा इशारा मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी देऊन दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
आपली कामे वेगाने होत नाहीत, नोकरशाही हवे तेवढे सहकार्य करत नाही असा सूर काही मंत्र्यांनी लावला आहे. सरकारमधील महत्त्वाचे मंत्री विजय सरदेसाई यांनी तर नोकरशाही कार्यक्षम नाही असे जाहीरपणे दोनवेळा नमूद केले. स्थिती गोंधळाची असतानाच सरकारने काल-परवाच एक परिपत्रक जारी केले व सर्व सरकारी फाईल्स व कागदपत्रे व पत्रे यापुढे वीज मंत्री काब्राल यांच्याच कार्यालयामार्फतच जावीत असे स्पष्ट केले. म्हणजेच कोणत्याही सचिवाला, कोणत्याही महामंडळाला किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिका-याला जो नोट किंवा पत्र येईल ते वीज मंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठविले जावे असे बजाविले गेले.
यामुळे काही मंत्री संतप्त बनले. काब्राल हे पर्रीकर यांच्या गैरहजेरीत प्रभारी सीएम झालेले आहेत काय असा प्रश्न मंत्र्यांना पडला व त्यांनी मुख्य सचिव शर्मा यांच्याशी संपर्क साधला. परिपत्रक त्वरित मागे घ्या अशी मागणी मंत्र्यांनी केली. परिपत्रकात तांत्रिक चुका राहिल्या असून ते परिपत्रक मागे घेतले जाईल किंवा पूर्ण दुरुस्त केले जाईल,अशी ग्वाही मुख्य सचिवांनी दोघा मंत्र्यांना दिली. आता हे नवे परिपत्रक कधी येते याकडे सगळे मंत्री लक्ष ठेवून बसले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर हे अजून काही दिवस सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकणार नाहीत. ते आपल्या घरीच विश्रंती घेत आहेत. अधूनमधून थोडे कामही ते करतात पण त्यांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा आहे. पूर्वीच्या तुलनेत आरोग्य आता सुधारले आहे, असे सांगितले जाते.