गोव्यात अनुदानित दराने सरकारी नारळ विक्री सुरू, मुख्यमंत्र्यांकडून पणजीत उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 01:37 PM2018-02-01T13:37:44+5:302018-02-01T13:38:28+5:30
गोव्यात नारळाचे दर खुल्या बाजारात प्रचंड वाढल्यानंतर अनुदानित दराने नारळ विक्री करण्यास सरकारने गुरुवारी (1 फेब्रुवारी) प्रारंभ केला.
पणजी - गोव्यात नारळाचे दर खुल्या बाजारात प्रचंड वाढल्यानंतर अनुदानित दराने नारळ विक्री करण्यास सरकारने गुरुवारी (1 फेब्रुवारी) प्रारंभ केला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीत तर कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी फातोर्डा येथे नारळ विक्रीला सुरूवात केली. सरकार प्रथम दोन महिनेच नारळ विक्रीचा उपक्रम राबवेल. तोपर्यंत जर खुल्या बाजारात नारळाची किंमत कमी झाली नाही तर, मग पुढील निर्णय घेता येईल, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी नारळ विक्रीला आरंभ केल्यानंतर आल्तिनो येथे पत्रकारांना सांगितले.
घाऊक पद्धतीने नारळ खरेदी केल्यानंतर जो दर लावला जातो, त्या दराने आम्ही ग्राहकांना नारळ देऊ. महागाई कमी होईपर्यंत तरी ही विक्री सुरू ठेवावी लागेल. तथापि, अगोदर दोन महिने योजना सुरू ठेवून पाहूया, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा फलोत्पादन विकास महामंडळाची राज्यभर दालने आहेत. गुरुवारी फक्त दोन दालनांमधून अनुदानित दराने नारळ विक्री सुरू झाली. टप्प्याटप्प्याने अन्य दालनांमधूनही नारळ विक्री करण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले आहे. नारळाच्या आकारानुसार 15, 18 आणि 20 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. एका कुटुंबाला 15 दिवसांसाठी 15 दिले जाणार आहेत. त्यासाठी ग्राहकाने एलपीजी गॅस सिलिंडरचे कार्ड घेऊन येणो बंधनकारक आहे. हे कार्ड दाखविल्यानंतर नारळ कमी दराने दिले जातील.
मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्यातील सत्तरी, डिचोली, काणकोण, सांगे अशा तालुक्यांध्ये नारळाचे उत्पादन घटले, कारण माकड व खेत्यांनी उच्छाद मांडला आहे. उपद्रवी प्राण्यांमुळे नारळ उत्पादन कमी झाले. दरम्यान, माईट रोगामुळेही नारळाचे उत्पादन कमी झाल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.
पणजीत फलोत्पादन महामंडळाच्या दालनामधून अनुदानित दराने नारळ विक्री सुरू झाल्याचे कळून येताच मोठय़ा संख्येने नागरिकांनी प्रतिसाद दिला. एलपीजी गॅस सिलिंडरचे कार्ड घेऊन अनेक नागरिक आले. मुख्यमंत्री र्पीकर यांच्या हस्ते त्यांना नारळ देण्यात आले. यावेळी मंत्री जयेश साळगावकर, आमदार प्रविण झाटय़े, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर, व्यवस्थापकीय संचालक श्री. केळकर आदी उपस्थित होते. महिला काँग्रेसनेही गेले काही दिवस कमी दरात राज्यभर नारळ विक्री केली व सरकार लोकांसाठी काहीच करत नसल्याची टीका केली होती.