पूनम पांडेच्या नवीन पॉर्न व्हिडीओमुळे गोवा सरकार कात्रीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 06:44 PM2020-11-03T18:44:22+5:302020-11-03T18:45:43+5:30
गोवा पॉर्न डेस्टिनेशन म्हणून प्रमोट करू पाहताय का?, गोवा फॉरवर्डचा सवाल
मडगाव - आपल्या पॉर्न व्हिडिओसाठी नेहमीच चर्चेत असणारी पूनम पांडे आपल्या गोव्यात शूट केलेल्या आणखी एका पॉर्न व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. सरकारी मालमत्तेत हा व्हिडीओ शूट झाल्याने हा व्हिडीओ शूट करण्यासाठी परवानगी कुणी दिली असा सवाल करून गोवा फॉरवर्ड या पक्षाने भाजप सरकार गोवा हे 'पॉर्न डेस्टिनेशन' म्हणून प्रमोट करू पाहत आहे का असा सवाल केला आहे.
दोन महिन्यापूर्वी आपला हनिमून साजरा करण्यासाठी गोव्यात आलेल्या पूनमने काणकोण येथील चापोली धरणावर हा व्हिडिओ शूट केला होता. सध्या गोव्यात तो व्हायरल झाला आहे. या प्रकरणी काणकोणच्या एका स्थानिक युवकाने काणकोण पोलिसात तक्रारही दिली आहे. पूर्णपणे पॉर्न या व्याख्येत मोडणारा हा व्हिडीओ पाटबंधारे खात्याच्या मालकीच्या धरणावर कसा शूट केला गेला असा सवाल गोवा फॉरवर्डने प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी केला असून या प्रकाराची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. या धरणावर कुणालाही जाता येत नाही मग हे शूटिंग कुणाच्या परवानगीने झाले आणि त्यामागे कोण आहे याची चौकशी सरकारने करावी आणि पाटबंधारे खात्याच्या परवानगीने हा प्रकार झाला असल्यास त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री फिलिप नेरी रोड्रिग्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
गोवा फॉरवर्डच्या महिला शाखेच्या अध्यक्ष अश्मा सय्यद यांनी या व्हिडिओला तीव्र आक्षेप घेताना, याआधी या सारकामुळे गोव्याची गोव्याची ओळख ड्रग्स डेस्टिनेशन आणि पार्टी डेस्टिनेशन अशी झाली आहे . आता हे सरकार गोव्याची जाहिरात ' पॉर्न डेस्टिनेशन' म्हणून करू पहात आहे का असा सवाल केला आहे. या संबंधी गोवा फॉरवर्ड रीतसर तक्रार नोंदविणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले.
पोलीस तपास चालू
या संबंधी काणकोण पोलिसात जी तक्रार दाखल करण्यात आली आहे तिचा पोलीस तपास करीत आहेत अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली. या पूर्वी याच पोलीस स्थानकावर पूनमने आपला पती सॅम बॉम्बे याच्या विरोधात आपल्याला मारहाण करण्याची आणि विनयभंग करण्याची तक्रार नोंद केली होती. त्याच दरम्यान हा वादग्रस्त व्हिडिओही शूट झाला होता.