बंद मोडून काढण्यासाठी गोव्यात ‘एस्मा’लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 10:22 PM2019-01-07T22:22:33+5:302019-01-07T22:28:56+5:30
बुधवारी खाजगी बस वाहतूक, फेरीबोटी, टॅक्सी, रिक्षा, बँका बंदची हाक
पणजी : कामगार संघटना ९ रोजी भारत बंद पाळणार आहेत. हा बंद यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. गोव्यातील औद्योगिक वसाहती, खाजगी बस वाहतूक, फेरीबोटी, टॅक्सी, रिक्षा, बँका बंद 9 तारखेला बंद राहणार आहेत. सरकारी कर्मचारी संघटनेनेही या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कर्मचाºयांना केले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीची पावले उचलत सोमवारी अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला.
आयटक तसेच अन्य कामगार संघटनांनी वेगवेगळ्या शहरांमधील बाजार समित्यांशीही संपर्क साधून बंदमध्ये सहभागी होण्याची हाक दिली आहे. कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली केंद्र सरकार कामगारविरोधी धोरण राबवित असल्याचा आरोप आहे तर दुसरीकडे मोटर वाहन कायद्यातील दुरुस्तीला वाहतूक क्षेत्रातील व्यावसायिकांचा विरोध आहे.
सोमवारी आयटकचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, अॅड. राजू मंगेशकर, अॅड. सुहास नाईक, बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदिप ताम्हणकर यानी पणजीतील बाजारपेठेत फिरुन बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सायंकाळी पेडणे येथेही त्यांनी भेट देऊन बंदचे आवाहन केले.
दहा कामगार संघटनांनी आज आणि उद्या असा दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारलेला आहे. आज सकाळी राजधानी शहरात केवळ मोर्चा काढला जाईल. सर्व कामगार, बँक कर्मचारी यात सहभागी होतील. सकाळी १0 वाजता कदंब बस स्थानकावरुन आझाद मैदानावर हा मोर्चा निघेल आणि तेथे जाहीर सभा होईल. खाजगी बसेस बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कदंब महामंडळाने अतिरिक्त १५0 बसेस रस्त्यावर आणण्याची तयारी केली आहे.