सासष्टीतील कोविड रुग्णांच्या सुरक्षेबद्दल सरकार गंभीर आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:48 PM2020-09-17T12:48:09+5:302020-09-17T12:50:01+5:30
जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा केला जात असताना गोवा सरकारला सासष्टीच्या कोविड रुग्णांच्या सुरक्षेचे खरेच पडून गेले आहे का असा सवाल सर्वसामान्य लोक करू लागले आहेत.
मडगाव - गोव्यात कोविडचे रुग्ण वाढत असताना राज्यात प्रत्येक तालुक्यात कोविड निगा केंद्र स्थापन करा अशी मागणी होत असताना दक्षिण गोव्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या सासष्टी तालुक्यातील सर्व निगा केंद्रे बंद केल्याने आता या तालुक्यातील रुग्णांना उपचार घेण्यासाठी शिरोडा, फार्मगुडी किंवा वास्को येथे जावे लागते. आज 17 सप्टेंबर रोजी सगळीकडे जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा केला जात असताना गोवा सरकारला सासष्टीच्या कोविड रुग्णांच्या सुरक्षेचे खरेच पडून गेले आहे का असा सवाल सर्वसामान्य लोक करू लागले आहेत.
तालुक्यात यापूर्वी ईएसआय इस्पितळामध्ये कोविड इस्पितळ सुरू करण्याबरोबरच मडगाव रेसिडेन्सी, कोलवा रेसिडेन्सी आणि फातोर्डा मल्टिपर्पज स्टेडियममध्ये कोविड निगा केंद्रे सुरू केली होती मात्र आता त्यापैकी मडगाव रेसिडेन्सी कोविड बाधित आरोग्य कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यासाठी वापरात येत असून कोलवा आणि फातोर्डा येथील निगा केंद्रे बंद करण्यात आली आहेत. शिरोडा, फर्मागुडी आणि वास्को येथील निगा केंद्रातील रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाल्याने सासष्टीतील दोन निगा केंद्रे बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र यामुळे सासष्टीतल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दूर जाण्याची पाळी आलेली असून त्यांच्या कुटुंबियांचीही त्यामुळे परवड होत आहे. नवीन जिल्हा इस्पितळातील वरचे रिकामे असलेले दोन मजल्यांचा कोविड निगा केंद्र म्हणून उपयोग करावा या मागणीकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे.
सरकारच्या या अनास्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना आपचे दक्षिण गोवा निमंत्रक सिद्धार्थ कारापूरकर यांनी एका बाजूने सरकार गोव्यात कोविड रुग्णांची संख्या दर दिवशी 1 हजारवर पोहोचणार असे म्हणते आणि दुसऱ्या बाजूने सुरू केलेली निगा केंद्रे बंद का करते असा सवाल केला आहे. जिल्हा इस्पितळाचे वरचे दोन मजले निगा केंद्र म्हणून वापरता येणे शक्य आहे असे तज्ञ सांगतात तरीही त्याकडे दुर्लक्ष का केले जाते असा सवाल त्यांनी केला.
मिळालेल्या माहितीनुसार कोलवा रेसिडेन्सीचा वापर मडगावात सुरू करण्यात येणाऱ्या कोविड इस्पितळातील डॉक्टरांना ठेवण्यासाठी तर मल्टिपर्पज स्टेडियमचा वापर अन्य कर्मचाऱ्यांना राहण्यातासाठी करण्याचा सरकारचा मानस आहे. या संबंधी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई याना विचारले असता सासष्टीकरांचे या सरकारला काहीच पडून गेलेले नाही हेच त्यावरून सिद्ध होते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.