गोव्यात सरकारी नोकरीची वयोमर्यादा आता 45
By admin | Published: June 17, 2016 09:07 PM2016-06-17T21:07:06+5:302016-06-17T21:07:06+5:30
राज्य सरकारी सेवेत प्रवेशासाठी मंत्रिमंडळाने उमेदवारांच्या वयोमर्यादेत 40 वर्षांवरून कमाल 45 वर्षे अशी वाढ केली आहे.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 17 - राज्य सरकारी सेवेत प्रवेशासाठी मंत्रिमंडळाने उमेदवारांच्या वयोमर्यादेत 40 वर्षांवरून कमाल 45 वर्षे अशी वाढ केली आहे. काही विशिष्ट दर्जाची पदे वगळता अन्य सर्व प्रकारच्या भरतीसाठी शुक्रवार (दि. 17) पासूनच ही पाच वर्षांची वाढ लागू झाल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी जाहीर केले. ते म्हणाले की, काही पदांसाठी अगोदरच 40 पेक्षा कमी वयोमर्यादा निश्चित केलेली असते, तर काही पदांसाठी 45पेक्षाही जास्त वयोमर्यादा गरजेची असते. त्यात काही बदल होणार नाही; पण सर्वसाधारणपणे सरकारी नोकरीसाठी जी वयोमर्यादा 40पर्यंत मर्यादित केली होती, ती आता 45 झाली आहे.
सध्या जी नोकर भरती सुरू आहे, त्याचाही संबंध या वाढीशी येतो. सध्या काही खात्यांनी जाहिराती देऊन इच्छुक उमेदवारांकडून पदे भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. मात्र अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नसेल, तर संबंधित खाती नवी दुरुस्ती जाहिरात जारी करतील आणि 45 वयोमर्यादा लागू करतील. जर अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली असेल, तर मात्र 40 या वयोमर्यादेत बदल केला जाणार नाही.