गोवा सरकारचे खातेवाटप जाहीर, जेनिफर पहिल्या महिला आयटी मंत्री, माविन व विश्वजितचे खाते बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 08:55 PM2019-07-15T20:55:32+5:302019-07-15T20:55:56+5:30
राज्यातील चारही नव्या मंत्र्यांना सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खात्यांचे वाटप केले. नव्या मंत्रिमंडळात माहिती व तंत्रज्ञान खाते जेनिफर मोन्सेरात यांना मिळाले आहे.
पणजी - राज्यातील चारही नव्या मंत्र्यांना सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खात्यांचे वाटप केले. नव्या मंत्रिमंडळात माहिती व तंत्रज्ञान खाते जेनिफर मोन्सेरात यांना मिळाले आहे. श्रीमती मोन्सेरात ह्या गोव्याच्या पहिल्या महिला आयटी मंत्री ठरल्या आहेत. लोबो यांना कचरा व्यवस्थापन, विज्ञान तंत्रज्ञान ही खाती देऊन मुख्यमंत्र्यांनी खूष केले तर माविन गुदिन्हो व विश्वजित राणो या दोन मंत्र्यांची खाती बदलून त्यांना प्रत्येकी एक नवे खाते दिले.
खाते वाटपाची अधिसूचना सोमवारी दुपारी जारी झाली. मोन्सेरात यांच्यासह बाबू कवळेकर, मायकल लोबो आणि फिलिप नेरी रॉड्रीग्ज या चौघा मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी झाला होता. चौघापैकी तिघेजण काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत. नव्या सरकारमध्ये बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना नगर नियोजन, कृषी, कारखाने व बाष्पक अशी खाती दिली गेली आहेत. श्रीमती मोन्सेरात यांना आयटी, महसुल, मजुर व रोजगार ही खाती दिली गेली तर फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांना मच्छीमार आणि जलसंसाधन ही खाती मिळाली आहेत. लोबो यांना बंदर कप्तान, विज्ञान व तंत्रज्ञान आणि घन कचरा व्यवस्थापन, ग्रामीण विकास यंत्रणा ही खाती मिळाली आहेत.
वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडील पशूसंवर्धन खाते मुख्यमंत्र्यांनी काढून घेऊन ते स्वत:कडे ठेवले तर आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांच्याकडील कायदा खाते काढून ते वीज मंत्री निलेश काब्राल यांना दिले आहे. मंत्री राणो यांच्याकडे अवघ्याच दिवसांपूर्वी कायदा व न्याय खाते दिले गेले होते. निलेश काब्राल त्यामुळे खूप नाराज होते. आपल्याकडील कायदा खाते का काढले ते आपल्याला ठाऊक नाही असे यापूर्वी मंत्री काब्राल बोलत होते. त्यांना पुन्हा कायदा खाते देताना मुख्यमंत्री सावंत यांनी विश्वजित राणो यांना कौशल्य विकसन हे खाते दिले. माविन गुदिन्हो यांच्याकडील पशूसंवर्धन खाते मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे घेतले तर माविनला गृहनिर्माण हे अतिरिक्त खाते दिले. पूर्वी विजय सरदेसाई यांच्याकडे जी खाती होती, ती सगळी खाती कवळेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
मंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत - गृह, पर्सनल, दक्षता, अर्थ, सर्वसाधारण प्रशासन व इतर
बाबू कवळेकर - नगर नियोजन, कृषी, पुरातत्त्व, पुराणवस्तू, कारखाने व बाष्पक
बाबू आजगावकर - पर्यटन, क्रिडा, राजभाषा, सार्वजनिक गा:हाणी, प्रिंटिंग व स्टेशनरी
जेनिफर मोन्सेरात - महसुल, आयटी, मजुर व रोजगार
गोविंद गावडे - कला व संस्कृती, अनुसूचित जमात, नागरी पुरवठा, सहकार
फिलिप नेरी रॉड्रीग्ज - जलसंसाधन, मच्छीमार, वजन व माप
मायकल लोबो - कचरा व्यवस्थापन, विज्ञान तंत्रज्ञान, बंदर कप्तान, ग्रामीण विकास
माविन गुदिन्हो - वाहतूक, पंचायती राज, गृहनिर्माण, शिष्टाचार, विधिमंडळ व्यवहार
विश्वजित राणे - आरोग्य, उद्योग व वाणिज्य, महिला व बाल कल्याण, स्कील डेव्हलपमेन्ट
मिलिंद नाईक - नगर विकास, समाज कल्याणस्, नदी परिवहन, प्रोव्हेदोरिया
निलेश काब्राल - वीज, पर्यावरण, कायदा व न्याय, अपारंपरिक उर्जा ोत
दीपक प्रभू पाऊसकर - सार्वजनिक बांधकाम, टेक्सटाईल व कॉयर