राफेल डीलवरून गोवा सरकारमध्ये खळबळ; ऑडिओ क्लीपच्या चौकशीची सत्ताधाऱ्यांचीही मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 06:59 PM2019-01-02T18:59:11+5:302019-01-02T18:59:28+5:30
पणजी : राफेलप्रश्नी ऑडिओ क्लीप बाहेर आल्याच्या विषयावरून गोवा सरकारमध्येही खळबळ उडाली आहे. ही क्लीप खोटी असल्याचे भाजपचे मंत्री ...
पणजी : राफेलप्रश्नी ऑडिओ क्लीप बाहेर आल्याच्या विषयावरून गोवा सरकारमध्येही खळबळ उडाली आहे. ही क्लीप खोटी असल्याचे भाजपचे मंत्री आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगून या प्रकरणी पोलिस चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. दुसऱ्याबाजूने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे निश्चितच या प्रकरणी चौकशी करून घेतील, असे भाजपचे दुसरे एक मंत्री निलेश काब्राल यांनी म्हटले आहे. तर पर्रीकर यांच्याकडे राफेलच्या महत्त्वाच्या फाईल्स असल्याने पर्रीकर यांना संरक्षण दिले जावे, अशी मागणी विरोधी काँग्रेस पक्षाने केली आहे.
राफेलच्या विषयावरून गोव्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपविरुद्ध काँग्रेस असा नवा वाद सुरू झाला आहे. मात्र ऑडिओ क्लीपचे गांभीर्य वाढले आहे. राफालेविषयीच्या महत्त्वाच्या फाईल्स आपल्याकडे व आपल्या बेडरूममध्ये आहेत असे पर्रीकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीवेळी मंत्र्यांना सांगितले असे मंत्री राणे यांनी म्हटल्याचे ऑडिओ क्लिपद्वारे विरोधी काँग्रेस पक्ष सांगत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली. या क्लीपमधील आवाज हा मंत्री राणे यांचाच आहे असे आपण सांगू शकतो, कारण आपण साऊंड इंजिनिअरही आहे असे बुयांव म्हणाले.
राणे यांची लाय डीटेक्टर चाचणी झाली तर सत्य बाहेर येईल. त्यामुळे लाय डिटेक्टर चाचणी व्हावी. तसेच राणे यांच्यासोबत जी व्यक्ती क्लीपमध्ये बोलताना आढळते, त्या व्यक्तीला पोलिस संरक्षण दिले जावे आणि मुख्यमंत्री पर्रीकर यांनाही सुरक्षा पुरविली जावी, कारण स्व. लोधा, हरेन पांडय़ा यांच्याबाबतची पुनरावृत्ती गोव्यात व्हायला नको. पर्रीकर यांच्या जीवितास भाजपकडून धोका संभवतो असे बुयांव म्हणाले.
पर्रीकर आता संरक्षण मंत्री नाहीत, तरी देखील त्यांच्याकडे राफेलविषयीच्या फाईल्स असल्याने देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातून देशाच्या गृह मंत्र्यांनी या विषयात लक्ष घालावे. लगेच सीबीआयसारख्या यंत्रणोला पर्रीकर यांच्या फ्लॅटची झडती घेण्यास सांगितले जावे. एवढेच नव्हे तर दिल्लीत र्पीकर यांच्यासोबत कृष्णमूर्ती व अन्य अधिकारी असायचे व त्यामुळे त्यांचीही चौकशी सीबीआयने करावी असे बुयांव म्हणाले. राफेलविषयी र्पीकर ज्यावेळी बोलले तेव्हा जे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते, त्यांचीही चौकशी केली जावी, ते खरे सांगू शकतील असे बुयांव म्हणाले.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी ऑडिओ क्लीपच्या विषयाबाबत ट्वीट केले आहे. सर्वोच्च न्यायालयात हरल्याने काँग्रेस पक्ष नैराश्याने राफेलप्रश्नी खोटी माहिती उभी करू पाहत आहे. पण मंत्रिमंडळ बैठकीत किंवा अन्य कोणत्याच बैठकीत राफेलविषयी चर्चा झालेली नाही असे पर्रीकर यांनी म्हटले आहे.