गोवा सरकारचे आणखी १५0 कोटी रुपयांचे कर्जरोखे,आर्थिक कसरती चालूच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 07:42 PM2018-03-09T19:42:39+5:302018-03-09T19:42:39+5:30
गोवा सरकारने आर्थिक कसरती करताना आणखी १५0 कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत.
पणजी : गोवा सरकारने आर्थिक कसरती करताना आणखी १५0 कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत. दहा वर्षांच्या मुदतीच्या या रोख्यांसाठी येत्या १३ रोजी बोली स्वीकारल्या जातील. रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात लिलांव होईल. यशस्वी बोलिधारकाने १४ मार्च रोजी रोख्यांची रक्कम भरावी लागेल.
वित्त खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारला एकूण घरेलू उत्पन्नाच्या ३ टक्क्यांपर्यंत कर्ज काढता येते. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षासाठी सुमारे २१00 कोटी रुपये कर्जाची मर्यादा घालून दिली होती आणि या मर्यादेच्या चौकटीत राहूनच हे कर्ज काढलेले आहे, असा दावा त्याने केला. आर्थिक वर्ष संपत आले आहे. आतापर्यंत केवळ १३५0 कोटी रुपये कर्ज घेतलेले आहे. चालू आर्थिक वर्षातील हे अखेरच्या टप्प्यातील कर्ज आहे. रोख्यांचे सर्व व्यवहार भारतीय रिझर्व्ह बॅन्केतर्फेच केले जातात. या अधिकाऱ्याचा असाही दावा होता की, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कर्ज घेणे स्वाभाविक आहे. कर्ज घेतले नाही तर विकास होणार नाही आणि विकास झाला नाही तर एकूण घरेलू उत्पन्नही वाढणार नाही.
दरम्यान, सरकारच्या डोक्यावर आतापर्यंत तब्बल १३ हजार कोटी रुपये कर्ज झाल्याचे नुकतेच विधानसभेत मांडण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले होते. राज्य सरकारने आतापर्यंत केंद्र सरकारकडून तसेच खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलले आहे.