न्यूड पार्टीच्या जाहिरातबाजीने गोवा सरकारची अडचण; आरोपीला अजून अटक नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 04:09 PM2019-09-27T16:09:51+5:302019-09-27T16:15:42+5:30
न्यूड पार्टी गोव्यात आयोजित केली जाईल अशा प्रकारची जाहिरातबाजी जोरात सोशल मिडियावरून करण्यात आल्यानंतर गोवा सरकारसमोर मोठी अडचण निर्णाण झाली.
पणजी: न्यूड पार्टी गोव्यात आयोजित केली जाईल अशा प्रकारची जाहिरातबाजी जोरात सोशल मिडियावरून करण्यात आल्यानंतर गोवा सरकारसमोर मोठी अडचण निर्णाण झाली. या जाहिरातबाजीशी गोव्याचा संबंध नाही, कारण जाहिरात दिल्लीहून केली जाते असे सरकारने सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महिला फोरम आणि विरोधी पक्षांनी सरकारच्या पर्यटन धोरणाला टीकेचे लक्ष्य बनविले आहे. तसेच जाहिरात करणाऱ्या संबंधित आरोपीला पकडून अटक केली जाईल असे सरकारने जाहीर केले होते. मात्र अजुनही संबंधित आरोपीला अटक न केल्याने सरकारवर टीका करण्यात येत आहे.
उत्तर गोव्यातील आश्वे- मोरजी येथे न्यूड पार्टी आयोजित केली जाईल व त्यात देशी व विदेशी महिला असतील अशा प्रकारची जाहिरात केली गेली. अगोदरच गोवा सरकारने कॅसिनो जुगाराला प्रोत्साहन दिल्याने भाजप सरकारविरुद्ध टीका होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वीचे काही जबाबदार पदाधिकारीही सरकारवर टीका करत आहेत. माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांनीही सोशल मीडियावरून टीकेची झोड उठवली आहे.
तसेच आता न्यूड पार्टीची जाहिरात गाजू लागल्यानंतर गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची अडचण झाली आहे. मुख्यमंत्री देव दर्शनाला केरळमध्ये गेले होते, पण तिथूनच त्यांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला व न्यूड पार्टी प्रकरणी चौकशी करण्याची सूचना केली. पोलिसांनी चौकशी केली व जाहिरात दिल्लीहून केली जाते असा शोध लावला. आरोपीला अटक केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते पण तीन दिवस झाले तरी देखील कोणत्याही संशयीताला अटक न झाल्याने महिला फोरमने न्यूड पार्टीच्या जाहिरातीचा निषेध केला व गोव्याला सॅक्स टुरिझमचे केंद्र बनवू नका असाही सल्ला विविध घटकांना दिला.
गोव्याने जागतिक पर्यटन दिवस शुक्रवारी साजरा केला. हे निमित्त साधून केंद्रातील एनडीएचा भाग असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने टीकेचा सूर लावला आहे. ड्रग्ज, सॅक्स यामुळे गोव्याच्या पर्यटनाची अधोगती होत आहे, पातळी घसरत आहे, अशी टीप्पणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी शुक्रवारी एका ट्विटरद्वारे केली आहे.
सरकारचा प्राधान्यक्रमच चुकल्याने ड्रग्ज, सॅक्स, जुगार, न्यूड पार्टी अशासाठी गोव्याचे पर्यटन ओळखले जाऊ लागले आहे. तुकड्यातुकड्यांचे शॅाक धोरण किंवा कचरा व्यवस्थापन धोरण म्हणजे गोव्याचे पर्यटन नव्हे हे गोव्यातील सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे,असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. गोव्याला भेट देणा:यांची सुरक्षा व स्थानिकांचा सामाजिक- आर्थिक विकास अपेक्षित असलेले र्सवकष पर्यटन धोरण गोव्याला हवे आहे असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.