श्रुती, दीपश्री कोठडीतच; 'पूजा'ला पणजी पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2024 11:44 AM2024-11-17T11:44:40+5:302024-11-17T11:46:18+5:30
फसवणुकीच्या प्रकरणातील आणखी एक संशयित दीपश्री गावस-सावंत हिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
फोंडा: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लोकांची लुबाडणूक केलेल्या श्रुती प्रभू उर्फ प्रभुगावकर (रा. पर्वरी) हिची पोलिस कोठडी आणखी सहा दिवसांनी वाढविण्यात आली आहे. ढवळीतील येथील शिक्षक योगेश कुंकळीकर याने लोकांकडून सुमारे दोन कोटी रुपये गोळा करून ते श्रुती हिच्याकडे दिले होते. या दोघांनी पैसे दिलेल्या लोकांना सरकारी नोकरीची आमिषे दाखवली होती. दरम्यान, फसवणुकीच्या प्रकरणातील आणखी एक संशयित दीपश्री गावस-सावंत हिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
मात्र, नंतर नोकरी देण्यास टाळाटाळ होत असल्याने संगम बांदोडकर यांनी आधी योगेश कुंकळीकर याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला. यानंतर योगेशने श्रुती हिच्याकडे पैसे दिल्याचा जबाब पोलिसांना दिला. पोलिसांनी श्रुतीविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करून मंगळवारी पहाटे तिला पर्वरी येथून अटक केली होती. त्यावेळी तिला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. शनिवारी श्रुतीला पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता, आणखी सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजयनाथ कवळेकर तपास करत आहेत.
योगेश कुंकळीकरच्या कोठडीत वाढ
नोकरी कांड प्रकरणात अटक करण्यात आलेला शिक्षक योगेश शेणवी-कुंकळीकर याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. शनिवारी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, चार दिवसांची अतिरिक्त पोलिस कोठडी सुनावली.
दीपश्रीला न्यायालयीन कोठडी
या प्रकरणातील आणखी एक संशयित दीपश्री गावस-सावंत हिला न्यायालयाने शनिवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. माशेल येथे शिक्षिकेची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा गुन्हा तिच्यावर दाखल आहे. परंतु, संदीप परबने दीपश्रीविरुद्ध म्हार्दोळ पोलिसात गुन्हा नोंदवला असल्याने तिला म्हार्दोळ पोलिसही अटक करतील. पोलिसांच्या जबानीत त्याने दीपश्रीला सुमारे साडेचार कोटी रुपये दिल्याचे म्हटले आहे.
'पूजा'ला पणजी पोलिसांकडून अटक
पणजी: नोकरी विक्री प्रकरणात सर्वाधिक फसवणुकीचा ठपका असलेली पूजा नाईक हिला आता पणजी पोलिसांनी अटक केली. पूजा नाईक विरुद्ध नोकरी देण्याचे आमिष दाखवून ६ लाखांना गंडा घातल्याचा गुन्हा पणजी पोलिसांत नोंद झाला होता. कालापूर (तिसवाडी) येथील सुषमा सदाशिव नाईक यांनी तक्रार दिली. पूजाने ६ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०२० या काळात सुषमा यांच्याकडून पैसे घेतले.