गोव्यामध्ये 5 अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 12:25 PM2018-03-16T12:25:42+5:302018-03-16T12:25:42+5:30
गोव्यामध्ये पाच अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी (16 मार्च)लोकार्पण करण्यात आले.
पणजी : गोव्यामध्ये पाच अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी (16 मार्च)लोकार्पण करण्यात आले. हृदयविकाराशीसंबंधित आधुनिक पद्धतीचे उपचार रुग्णांना तातडीने देण्यासाठी या रुग्णवाहिकांमध्ये प्रशिक्षित डॉक्टरही उपलब्ध असणार आहेत. भारतात अन्य कुठेच अशा प्रकारच्या रुग्णवाहिका कधीही सेवेत उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. यासंबंधी प्रयोग करण्याच्या हेतूने या गोव्यामध्ये अशा प्रकारच्या रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.
अत्याधुनिक रुग्णवाहिकांच्या लोकार्पणाचा सोहळा पणजीत पार पडला. एमआरएफ कंपनीने दिलेल्या निधीतून रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे. राज्यात विविध कारणास्तव जीवनशैलीविषयक आजार वाढत आहेत. हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा कारणास्तव हृदयचा आजार असलेल्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. अनेकदा हृदयविकाराचा झटका आलेले रुग्ण इस्पितळात पोहोचेपर्यंत मरण पावतात. यावर उपाय म्हणून गोव्यात विशेष अशा रुग्णवाहिका 10 ठिकाणी उपलब्ध करायच्या अशी योजना असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.
हृदयरोगविषयक रुग्णांचीच काळजी घेण्याच्या हेतूने सध्या पाच रुग्णवाहिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यात विविध आधुनिक उपकरणे व इंजेक्शन्स असतील. छातीत कळा येऊ लागल्या किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे दिसू लागली की, रुग्णांनी 108 कार्डिअॅक रुग्णवाहिका बोलवावी. रुग्णवाहिकेत उपलब्ध असलेले डॉक्टर या रुग्णाला रुग्णवाहिकेत उपचार देतील व सुस्थितीत हॉस्पिटलमध्ये पोहोचवतील, असे राणे यांनी नमूद केले. एलेक्सिन नावाचे इंजेक्शन रुग्णवाहिकांमध्ये व इस्पितळात उपलब्ध केले जाईल. त्यावर एकूण साडेतीन कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, असे राणे यांनी सांगितले.
सध्या उत्तर व दक्षिण गोव्यात मिळून दोन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येतील. येत्या काही दिवसांत पाच पैकी उर्वरित तीन रुग्णवाहिका सेवेत असतील. एकूण 17 डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. अगोदर पाच रुग्णवाहिका कशा चालतात ते पाहिले जाईल व मग आणखी रुग्णवाहिका आणण्याचा विचार केला जाईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. हृदयरोगविषयक उपचार करणा-या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळातही दोनपैकी एक रुग्णवाहिका उपलब्ध असेल. मडगाव येथील नव्या जिल्हास्तरीय इस्पितळात कॅत लॅब सुरू करायचा असा सरकारचा विचार आहे. ते शक्य न झाल्यास अपोलोकडून लिज तत्त्वावर कॅत लॅब प्राप्त केला जाईल. सरकारकडून राज्यात डायबेटीक रजिट्री नव्याने सुरू केली जाईल. इन्सुलिनसाठी निविदा जारी करण्यात आली आहे. नवजात अर्भक स्क्रीनिंगही सुरू केले जाईल. यापूर्वीच्या काळात अगोदरच्या सरकारने हे काम बंद केले होते, असे मंत्री राणे यांनी सांगितले.