वाघांनो सोडा गोमंतक देश, येथे खाणींनाच प्रवेश....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 01:08 PM2023-07-14T13:08:30+5:302023-07-14T13:10:54+5:30
जानेवारी २०२० मध्ये जहाल विषाचा प्रयोग करून चार वाघांच्या केलेल्या निर्घृण हत्येचे प्रकरण उघडकीस आले होते.
राजेंद्र पां. केरकर, पर्यावरणवादी
वाघांनो सोडा गोमंतक देश, येथे खाणींनाच प्रवेश.... अशी वास्तवाचे भान राखून वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मंदार दातार यांनी गोव्यातल्या पट्टेरी वाघांच्या दयनीय परिस्थितीचे दर्शन घडवणारी कविता दशकभरापूर्वी लिहिली होती. आपल्या कवितेत त्यांनी जी भावना उद्विग्नपणे मांडली होती, त्यात पर्यावरणवाद्यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही गोवा सरकारने वाघांच्या संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने ठोस भूमिका घेतलेली नसल्याने आज म्हादई अभयारण्यासारख्या नैसर्गिक अधिवासात मार्जर कुळातल्या या राजाला अस्तित्वाची लढाई देण्याची पाळी आली आहे. जानेवारी २०२० मध्ये जहाल विषाचा प्रयोग करून चार वाघांच्या केलेल्या निर्घृण हत्येचे प्रकरण उघडकीस आले होते. म्हादई अभयारण्याच्या कक्षेबाहेर वाघिणीने आपल्यासाठी आणि दोन बछड्यांसह निम्न प्रौढ वाघाला खाद्यान्न मिळावे म्हणून ज्या म्हशीवर हल्ला करून ठार केले होते तिच्या मृत कलेवरात हेतूपुरस्सर विष मिसळल्याने चार वाघांना सत्तरीतील गोळावलीच्या जंगलात मृत्यू आला.
वाघांच्या सान्निध्यात राहणाऱ्या गोळावलीच्या सिद्धाच्या वार्षिक भूगुतीच्या विधी दिवशी व्याघ्र हत्येचे हे प्रकरण उघडकीस आले. पट्टेरी वाघ अन्न साखळीच्या शिखरावर विराजमान असताना गोव्यातल्या सत्ताधाऱ्यांनी पश्चिम घाटातील वाघांच्या अस्तित्त्वावर खनिजाच्या वारेमाप संपत्तीच्या बेकायदेशीर उत्खननासाठी घाला घालण्याचे षडयंत्र यशस्वी केले. त्यामुळे व्याघ्र संरक्षणाची घटनादत्त जबाबदारी असणाऱ्या भारतीय वनसेवेतल्या वन खात्याच्या प्रमुखाने गोव्यात वाघ नाही, शेजारच्या महाराष्ट्र-कर्नाटकातून पर्यटकांसारखे ते इथल्या जंगलात ये-जा करतात, असे तुणतुणे प्रदीर्घकाळ वाजवण्यात धन्यता मानली. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्यात पट्टेरी वाघ आपल्या पूर्वजांनी शिकारीद्वारे इतिहासजमा केल्याची बाब उच्चरवाने व्यक्त करण्याचे धाडस केले.
२००९ साली के सत्तरीत जेव्हा पट्टेरी वाघाच्या गोळी घालून केलेल्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले, तेव्हापासून दशकभरात गोवा सरकारने जंगली श्वापदांच्या शिकारीवर प्रतिबंध घालण्यासाठी तसेच वाघाच्या नैसर्गिक अधिवासात वारंवार होणाऱ्या अक्षम्य मानवी अतिक्रमणे आणि हस्तक्षेप रोखण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेतली असती तर गोळावली येथे चार वाघांची विष प्रयोगाद्वारे हत्या करण्याचे धाडस गुन्हेगारांना झाले नसते.
२००९ साली वाघाची शिकार झाली, तेव्हा हत्येचे सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचीच काही अंशी पुनरावृत्ती गोळावलीत करण्याचे धाडस शिकाऱ्यांना झाले. लामगावातही पट्टेरी वाघाचा संचार असायचा; परंतु सत्तास्थानी आलेल्या आपल्या नेत्यांनी लोह आणि मँगनिज खनिजांच्या लालसेपायी भारतीय राज्य घटनेतल्या प्रचलित कायदेकानून यांच्याशी प्रतारणा करत खाण व्यवसायाला राजाश्रय देण्यासाठी वाघांचे समूळ उच्चाटन करण्याचा चंग बांधला आणि त्यामुळे केवळ दशकभरात पाच पट्टेरी वाघांची हत्या करण्याचे धाडस गुन्हेगारांना झाले. पाच वाघांच्या हत्येची ही दोन प्रकरणे जागृत पर्यावरणवाद्यांमुळे उघडकीस आली. या काळात उद्भवलेल्या व्याघ्र हत्येच्या दुर्घटना दुर्दैवाने वन खात्याच्या बेफिकीरपणामुळे प्रकाशात येऊ शकल्या नाहीत.
म्हादई अभयारण्याशिवाय सांगेतल्या नेत्रावळी तसेच काणकोणातल्या खोतीगावात आणि धारबांदोड्यातल्या मोले अभयारण्य आणि संरक्षित जंगलात वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे वारंवार आढळले आहेत. परंतु वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. दातार यांनी आपल्या कवितेत अभिव्यक्त केल्याप्रमाणे-
अभयारण्या भिडल्या खाणी
वने भासती बापुडवाणी
अंग चोरुनी उभे वृक्ष हे....
मोजीत घटका शेष....
अशी परिस्थिती वाघांसाठीही ठिकठिकाणी आहे. अभयारण्याबाबत स्थानिक जनतेत सातत्याने गैरसमज वाढत राहून आपल्या बेकायदा वृक्षतोड, रेती, खडी यांच्या उत्खननाला चालना मिळावी म्हणून स्वार्थांध सातत्याने वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहेत आणि तापलेल्या तव्यावर आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत. पट्टेरी वाघांसह त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहिला तर वनक्षेत्राचे अस्तित्व टिकेल आणि त्यातल्या तृणभक्षी जंगली श्वापदांना खाद्यान्न मिळेल. जलस्रोतांचे अस्तित्व समृद्ध होऊन प्राणवायूचे संतुलन टिकेल आणि कर्बवायूचे उत्सर्जन नियंत्रित होईल, याची जाणीव त्यामुळे स्वार्थी वृत्तीपायी दुर्बल झालेली आहे. डॉ. दातार यांनी कवितेच्या अखेरीस हेच वास्तव मांडले आहे.
लाख खाणी इथे वाढू द्या
मातीतून खनिजे काढू द्या
जिविधतेची कुणास चिंता
कशास कोणा क्लेश...
सोडा गोमंतक देश ...