सरकारी नोकर भरती आता आयोगामार्फतच; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 10:46 AM2023-05-30T10:46:20+5:302023-05-30T10:50:23+5:30
स्वतंत्र वेबसाइट तयार
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात सरकारी नोकर भरती यापुढे पूर्णपणे भरती आयोगामार्फतच केली जाईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सध्या सुरू असलेली नोकरभरती ही न्यायालयाच्या एका आदेशानुसार होत आहे. बांधकाम खात्याची भरती ही शेवटची स्वतंत्र भरती असेल. यापुढे सर्व सरकारी नोकर भरती कर्मचारी निवड आयोगामार्फतच होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कर्मचारी निवड आयोग तथा स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेबसाइट तयार झाली आहे. आयोग स्थापनेचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आपण पुढील काही दिवसांत वेबसाइटचे उदघाटन करू. आयोगामार्फत भरतीने दर्जेदार, गुणवान व चांगले मनुष्यबळ मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मोदी सरकारची विकास कामांची घोडदौड
- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची काल पणजीत पत्रकार परिषद झाली. मुख्यमंत्री सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, कृषिमंत्री रवी नाईक व वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते.
- 'मोदी सरकारने नऊ वर्षांत मोठ्या संख्येने विकास प्रकल्प देशात राबविले. पंधरा नवे विमानतळ बांधले. अनेक 'एम्स' संस्था उभ्या केल्या. एनआयटी व अन्य प्रकल्प आणले. इस्पितळे उभी केली. राष्ट्रीय महामार्गांची कामे केली. पंतप्रधान मोदी यांनी विविध राज्यांमध्ये अगदी जलद गतीने सर्वाधिक विकासकामे मार्गी लावली, असे कराड म्हणाले.
- मेट्रो, वंदे भारत आदी जलदगती धावणारी रेल्वेसेवा सर्वत्र सुरू झाली. गोव्यातही अशी रेल्वे सुरु होईल,' असे कराड यांनी सांगितले. गेल्या ७० वर्षांत जेवढी कामे झाली, त्यापेक्षा जलदगतीने गेल्या ९ वर्षापासून कामे होत आहेत, असेही कराड म्हणाले.