सरकारचा कार्यकाळ मध्यावर; मंत्र्यांच्या कामाचा आढावा हवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 11:13 AM2024-08-30T11:13:05+5:302024-08-30T11:13:58+5:30
मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दिले मंत्रिमंडळ बदलाचे संकेत, आता चतुर्थीनंतरच राज्यात होणार मोठ्या घडामोडी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बदलाचे पुन्हा एकदा संकेत दिले आहेत. सरकारचा कार्यकाळ मध्यावर आला की मंत्र्यांच्या कामाचा आढावा घ्यायलाच हवा व कोणताही सत्ताधारी पक्ष अशा प्रकारचा आढावा घेतच असतो, असे सावंत म्हणाले.
प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक मंत्र्याची प्रशासनातील कामगिरी, त्याचा कामाचा वेग, खात्यांतर्गत कामगिरी, लोकांनी मंत्र्यांबद्दल नोंदवलेली मते आदी गोष्टी विचारात घेऊन पक्षाशी सल्लामसलत करूनच मंत्रिमंडळ फेररचना केली जाते. सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ मध्यावर आला की मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणे आवश्यक आहे. कारण, अडीच वर्षांनंतर निवडणुकीला सामोरे जायचे असते, असे सावंत म्हणाले.
सरकारमधील काही मंत्री वादग्रस्त बनले आहेत. या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, २०१२ पूर्वी आधीच्या . सरकारमध्ये मंत्री कसे होते हे जनतेने अनुभवले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात लूट चालली होती. कला अकादमी, स्मार्ट सिटी, राज्यभरात रस्त्यांची झालेली दुरवस्था, डॉगरफोड प्रकरणांबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने कामे हाती घेतली नसती तर हे प्रश्नच उद्भवले नसते. पणजी शहर स्मार्ट सिटी व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून निधी आणून कामे करण्यास सुरुवात केली. रस्ते खोदावे लागल्यामुळे लोकांना त्रास झाला, हे मान्य आहे; परंतु दरवर्षी पावसात शहर बुडत होते, तसे यंदा झाले नाही. दर्जेदार वीज मिळावी, यासाठी भूमिगत वीजवाहिन्या घालाव्याच लागणार त्यासाठी खोदकाम केल्यावर काही प्रमाणात त्रास होणारच, हे लक्षात घेतले पाहिजे. पूर्वीच्या सरकारने कामेच केली नाहीत म्हणून कोणाला त्रास झाले नाहीत. आता आम्ही कामे करत आहोत. त्यामुळे सर्वकाही मार्गी लागेपर्यंत लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आरोग्य पर्यटनास सरकार प्रोत्साहन देत आहे. वेलनेस टुरिझमखाली १४ ते १५ हॉटेलांची नोंदणी झालेली आहे. गोव्यात स्वस्तात वैद्यकीय उपचारांची सोय झाल्यास विदेशातूनही पर्यटक येथे येऊ लागतील. मुख्यमंत्री एका प्रश्नावर म्हणाले की, मरीना प्रकल्प गरजेचा आहे. यामुळे येथे रोजगाराच्या संधी निर्माण होतीलच शिवाय आखातात जहाजांवर नोकरीसाठी येथील अनुभव उपयोगी ठरेल. ते पुढे म्हणाले की, सीएम हेल्पलाइनचा लोक उपयोग करू लागले आहेत. आतापर्यंत २९० तक्रारी निकालात काढलेल्या आहेत.
...म्हणून मी बोलतो
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काही मंत्र्यांची कामगिरी खराब झाली व मुख्यमंत्र्यांना अनेकदा हस्तक्षेप करावा लागला. त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, मी कोणतीही फाइल माझ्याकडे आली की पूर्णपणे अभ्यास करून विषय समजून घेतो. त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर उत्तर देणे मला सुलभ होते.
आम्ही कामे करतोय...
सुरळीत वीज पुरवठा व्हावा, भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ते खोदले जात आहे. या कामांमुळे लोकांची गैरसोय होत आहे. मात्र पूर्वीच्या सरकारने कामेच केली नाहीत त्यामुळे कोणाला यापूर्वी त्रास सहन करावा लागला नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
निधीचा योग्य वापर करा
वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने तसेच वेळेवर व्हायला हवा. पंचायती, पालिका आदी स्थानिक स्वराज संस्थांनी निधी विनावापर ठेवू नये, यासाठी पावले उचलली आहेत. हा निधी बँकेत कायम ठेव म्हणून ठेवण्यासाठी नव्हे, असे ते म्हणाले.