गोव्यातील राजकीय स्थैर्य धोक्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 10:11 PM2019-02-08T22:11:22+5:302019-02-08T22:12:34+5:30

मगो पक्ष आपल्या मागण्या धसास लावण्यासाठी भाजपाला नामोहरम करण्याची एकही संधी सध्या वाया घालवत नाही.

goa Govt threatens political stability? | गोव्यातील राजकीय स्थैर्य धोक्यात?

गोव्यातील राजकीय स्थैर्य धोक्यात?

Next

- राजू नायक

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काही बरेवाईट झाल्यास त्याचा परिणाम गोव्याच्या राजकीय स्थैर्यावर होईल, अशी चिंता गोव्यात सत्ताधारी पक्षाला आहे. पर्रीकरांना काही झाले तर सरकार कोसळेल, अशी भीती गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांनी व्यक्त केली आहे. 


मगो पक्ष आपल्या मागण्या धसास लावण्यासाठी भाजपाला नामोहरम करण्याची एकही संधी सध्या वाया घालवत नाही. त्यांनी शिरोडा मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे. ही पोटनिवडणूक घ्यावी लागतेय; कारण भाजपाने तेथे काँग्रेस आमदाराला राजीनामा देणे भाग पाडले. ते भाजपातर्फे निवडणूक लढविणार हे स्पष्ट असताना मगोप, जो सरकारात सामील आहे, भाजपाला अपशकुन करू पाहातो.


मगोपने शिरोडा येथे निवडणूक लढविणे याचा अर्थ सरकार कोसळणे, असे विधान गोवा फॉरवर्डचे नेते व मंत्री विजय सरदेसाई यांनी केले आहे. सरदेसाई यांनी अशीही पुस्ती जोडली की ते सरकार कोसळू देणार नाहीत. कारण त्यांच्याकडे ‘दुसरी योजना’ तयार आहे. त्यांना सुचवायचे आहे की ते एक तर मगोपलाच खिंडार पाडू शकतात किंवा काँग्रेसमध्ये फूट पडेल. मगोपच्या तीन पैकी दोन आमदारांनी यापूर्वीच भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधल्याची चर्चा आहे.


मगोपशी भाजपाने डाव खेळू नये व समर्थ खाती देऊन उपकृत करावे यासाठी मगोपचे हे व्यावहारिक डावपेच असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. सरदेसाई हे सध्या भाजपाला निकट गेले आहेत. मी भाजपाला त्यांच्या काही आमदारांपेक्षा निष्ठ झालो आहे, असे ते म्हणतात. काँग्रेसला पाठिंबा न देता पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली सरकार घडविले म्हणून काँग्रेस नेते सध्या सरदेसाईंवर नाराज आहेत. सरदेसाईंना बाहेर ठेवून सरकार घडविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी घटक पक्षांशी चर्चाही चालविल्याचे सांगितले जाते. सरदेसाईंचे कामत यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. परंतु आपल्याला वगळून मगोपच्या ढवळीकर यांच्याशी चालविलेल्या चर्चेमुळे सरदेसाई कमालीचे रुष्ट बनले असून त्यांचा पर्रीकरांबरोबरचा घरोबा वाढला आहे.


गोव्यात लोकसभेबरोबर विधानसभेच्या दोन्ही पोटनिवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. परंतु ज्या पद्धतीने राज्यात सत्ताधारी आघाडीत बेबनाव निर्माण झाला आहे, त्यामुळे केंद्रीय नेते कंटाळून विधानसभेच्याही निवडणुका एकाबरोबर घेणार तर नाहीत, अशीही चिंता घटक पक्षांना लागली आहे.
(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

Web Title: goa Govt threatens political stability?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.