सरकार आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारणार: गोविंद गावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 12:58 PM2023-12-05T12:58:47+5:302023-12-05T12:59:20+5:30
विविध स्पर्धांचे प्रस्ताव आलेत; 'जीसीए'ने देखील स्टेडियमसाठी प्रयत्न करावेत.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान ही काळाची गरज आहे. मी भविष्यात क्रीडामंत्री म्हणून राहिलो तर निश्चितच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान बांधणार आहे. सध्या प्राथमिक स्तरावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी देखील चर्चा सुरू आहे. गोवा क्रिकेट संघटनेतर्फे स्टेडियमबाबत काय सुरू आहे, हे मला माहिती नाही, परंतु सरकार निश्चितच आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारणार आहे, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
मंत्री गावडे यांनी 'लोकमत' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे देत दिलखुलास गप्पा मारल्या. स्टेडियमबाबत माझे वेगळे ध्येय आहे. मला जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारायचे आहे, ते पूर्णपणे आधुनिक असणार आहे. तसेच त्याचा वापर महसूल तयार करण्यासाठी होणार आहे. त्यासाठी सध्या जागा देखील शोधण्यात येत आहे, जिथे फाईव्ह स्टार हॉटेल, विमानतळ, हॉस्पिटल यासारखी सुविधा असायला हवी. सरकारतर्फे माझे प्रयत्न सुरू आहेत; पण जीसीएने देखील आपले प्रयत्न सुरू ठेवावेत, असेही गावडे म्हणाले.
राज्यात दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आल्यास स्वागत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सफल आयोजनानंतर गोव्याची मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठीची मागणी वाढत चालली आहे. गोवा जागतिक स्पर्धेच्या २ आयोजनाचे हब बनले आहे. आतापर्यंत सुमारे ६ ते ७ आंतरराष्ट्रीय स्पर्धा राज्यात घडविण्यासाठी प्रस्ताव आले आहेत. जर राज्यात दोन आंतरराष्ट्रीय स्टेडियम आले तर बहुतांश आयपीएल सामने राज्यात होऊ शकतात, असे गावडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा अन् स्पर्धा यशस्वी झाली
३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खरंतर शून्यातून उभी केली. याचे प्रमुख कारण म्हणजे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा लाभलेला पाठिंबा, मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला, तसेच ज्या गोष्टी तत्परतेने होणे आवश्यक होते, ते त्यांनी वेळ न घालवता करून घेतल्या, स्पर्धेवेळी अनेक अडथळे आले, परंतु मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे हे अडथळे त्वरित निर्णय घेऊन दूर करण्यास मदत मिळाली, असे गावडे यांनी सांगितले.